
भेट तुझी माझी स्मरते
त्या बकुळीच्या झाडाखाली
बकुळफुला सम नाजूक भाव उमटता
गाली आली लाली.
आकाशीचा तो चंद्रमा
मनोमनी हसत होता
टपटपत्या बकुळफुलातून
सुगंध शिंपित होता.
हातात घेवूनी हात माझा
वदलास शब्द प्रेमभरे
माझी होशिल का–
मनी संदेह न उरे.
आश्वासक त्या स्पर्शाने
ओळख पटली जन्मांतरीची
मनाने मनाला साद घालता
पाऊले चाललो सप्तपदीची.
अजून ही कातरवेळी
भेट तुझी माझी स्मरते
त्या बकुळगंधी आठवणीनी
तनु माझी रोमांचित होते.
अंजली गरगटे
पुणे















