
राजे तुम्ही शोभलात रयतेचे खरे राजे
दशदिशात तुमच्या कर्तुत्वाचा डंका वाजे
तुमच्या कर्तुत्वाचे गातोय पोवाडे
पराक्रमी, युगंधर राजमाता, शंभूराजे ।।1।।
प्राणांचीआहुती देत हिंदवी स्वराज्य निर्मिले
त्याग बलिदानाची समर्पित केली तिलांजली
आया बहिणीच्या रक्षणासाठी
तुम्ही झालात रयतेचे वाली।।2।।
पण राजे आज तुम्ही हवे होतात
तुमच्या विना झाली रयत पोरकी
अन्याय, अत्याचाराचं फोपावलं पीक
आया, बहिणींवर पडते नजर बेरकी।।3।।
या गिधाडांना तुम्ही केले असते शासन
दिली असते उन्मत हत्तीच्या पायी
सुळावर वा केला असता चौरंग
पुन्हा हंबरल्याअसत्या गोठ्यातल्या गायी।।4।।
स्वार्थाने घेरल्यात दिशा साऱ्या
वाटतं पुन्हा आम्ही गुलाम झालोय
सत्ता बोले जनता गुमान चाले
हुकूमशाहीत वाहत चाललोय।।5।।
राजे असं चाललय हिंदवी स्वराज्यात
पापाच्या नद्या वाहत आहेत
भ्रष्टाचाराचे पीक जोमात येऊन
शत्रूच त्याचा फायदा घेत आहे।।6।।
स्वाभिमान, स्वधर्म, स्वदेश
याचे घेणे देणेच उरले नाही
स्वतःची पोळी भाजण्यासाठीच
दूरवर त्यांची नजर जाई ।।7।।
राजे तुम्ही केली श्रींची इच्छा पूर्ण
मातेचा शब्द धीरोदात्त मानला
आज स्वराज्यात वाढली वृद्धाश्रमे
मानव जणू यंत्रवत बनला।।8।।
राजे शंभूराजांनी सोसल्या यातना
हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी
प्राण गेला तरी धर्म नाही सोडणार
रक्ताळला देह महाराष्ट्राच्या मातीसाठी।।9।।
राज जगणं, मरण सारखंच झालय
जनतेचा पावलागणिक घुसमटतो श्वास
तुम्ही पुन्हा महाराष्ट्री अवतरावे
हाच रयतेने घेतलाय नित्य ध्यास ।।10।।
सह्याद्रीच्या कडेकपारी अश्रू ढाळतायेत
राजे तुमच्या भेटीसाठी
शिवनेरीसह रायगड आसुसलाय
तुमच्या दिव्य चरण स्पर्शासाठी ।।11।।
तो स्वाभिमान,जाज्वल्य राष्ट्रप्रेम
राजे पुन्हा यांच्या मनात पेरा
सळसळेल रक्त पुन्हा एकदा
वाजतील शत्रूच्या तीन तेरा।।12।।
सौ. उज्ज्वला राजेंद्र यादव
हडपसर, पुणे.















