
आपल्या देशात इतिहासाचा विपर्यास जेवढा करण्यात आला, तेवढा जगाच्या पाठीवर कुठल्याही भागात झाल्याचे आढळत नाही. देश आमचा आर्य बाहेरचे, देश आमचा राज्य इंग्रजाचे, देश आमचा राज्य मोघलांचे, देश आमचा राज्य मानुवाद्याचे, प्रश्न मागासवर्गीयांचे, आयोगाचे अध्यक्ष सवर्ण जातीचे, शाळेत बहुजन समाजातील मुलांना प्रवेश दिला जातो, परंतु इतिहास त्यांच्या पद्धतीने शिकविला जातो. महराष्ट्राच्या इतिहासाचा केंद्रबिंदू छत्रपती शिवाजी महाराज आहेत. देशातीलच नव्हे, तर जगभरातील संशोधक, इतिहासकारांना त्यांनी भुरळ घातली. भारतात जात ही लवकर ओळखल्या जाते. शिवरायांच्या पराक्रमाविषयी जगभरात इतिहास प्रसिद्ध असतानाही त्यांना एका विशिष्ट जाती पुरते मर्यादित ठेवले जाते. त्यावरून लिखाण करण्यात येते. काही जन्म तारखेवरुन वाद घालतात.
शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. ही तारीख शासनाने ठरविली आहे, शासनाने संशोधन करून 2001 मध्ये अध्यादेश काढून ही जन्मतारीख निश्चित केली आहे. पण आजही शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आपल्या राज्यात शिवाजी महाराज जयंती आणि पुण्यतिथि दोन वेळा येते. हा एक निरर्थक वाद आहे. वर्णभेद, जातिभेदामुळे शिवरायांच्या राज्यभिषेकासाठी काशीच्या गागाभट्टाना रायगडला आणावे लागले.
*महात्मा फुलेंच खरे शिव अनुयायी*
राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फूले यांनी 19 फेब्रुवारी 1869 ला सार्वजनिक स्तरावर शिवाजी महाराजांच्या जयंतीची सुरूवात केली. त्यांनीच रायगड किल्ल्यावर महाराजांची दाट झाडा झुडूपात दडलेली समाधी शोधून काढली. एकोणिसाव्या शतकात शिवरायावरील पोवाडा कुणी आमचे शिवाजी महाराज म्हणणारे मराठे यांनी लिहिला नाही, तो महात्मा फुलेंनी लिहिला. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली होती ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली. 3 मे 1927 रोजी मुंबई जवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय प्रजासत्ताकाचे महान नायक आणि स्वराज्याचा अभिमान मानले जातात. शिवाजी महाराज अत्यंत हुशार, शूर, निर्भय, पराक्रमी आणि अत्यंत कुशल राज्यकर्ते व रणनीतीकार होते. शिवाजी महाराज एक योद्धा राजा होते आणि ते त्यांच्या शौर्य, रणनीती आणि प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी नेहमीच स्वराज्य वारसा यावर लक्ष केंद्रित केले होते. स्वराज्यात ते एक निष्णात सैनिक आणि एक कुशल प्रशासक बनले. ते अतिशय धार्मिक होते. परंतु धर्मांध नव्हते. लहानपणी त्यांच्यावर फार धार्मिक संस्कार झाले. आपल्या कौशल्याच्या आणि क्षमतेच्या जोरावर त्यांनी मावळ्यांना संघटित करून स्वराज्याची स्थापना केली.
लहानपणी शिवाजी महाराजांना राजकारण आणि युद्धाच्या युक्त्या शिकविल्या होत्या. राजमाता जिजाबाईंनी शिवरायांना धार्मिक ग्रंथांचे ज्ञान दिले. शिवाजी महाराजांचे गुरू जीजाबाई, संत तुकाराम होते. त्यांचा धार्मिक प्रभाव शिवाजी महाराजांवर पडला होता. त्यांनीच त्यांना मातृभूमीचा अभिमान बाळगायला शिकवले. शिवाजी महाराज धार्मिक होते, पण अंधश्रद्धाळू नव्हते.
*श्रद्धा*
शिवाजी महाराजांकडे 360 किल्ले होते. त्यापैकी अनेक किल्ले त्यांनी बांधले, अनेक किल्ल्याची डागडुजी केली, महाराजांनी एकाही किल्ल्यावर सत्यानारायणाची पुजा घातली नाही किंवा गणपतीचे मंदिर बांधले नाही, पण शिवाजी महाराजांनी मस्जिदी बांधल्या त्याचे पुरावे आजही सरकार दरबारी व गडावर उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांनी कधिही भविष्य पाहिले नाही, त्यांनी कधीच पंचाग पाहिले नाही, मुहर्त पाहिला नाही किंवा तिथी देखील पाहिली नाही प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस महत्वाचा मानला. शिवाजी महाराज हिंदूच्याच नव्हे तर मुसलमानाच्याही धार्मिक प्रतिकांचा सन्मान व आदर करित असत. शिवाजी महाराजाना संत तुकारामांचा जसा आदर होता तसाच केळशीचे हजरत पीर सय्यद बाबा याकूब यांचाही आदर होता. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर बाणकोटच्या खाडी जवळ केळसी या गावचे मुस्लिम संत सय्यद बाबा याकूब यांचा सन्मान ते करत असत. शिवाजी महाराज संत तुकारामांना जसे गुरु मानत तसेच ते हजरत पीर याकूब बाबांनाही गुरु मानत असत. सन 2008 मध्ये मी दापोलीला नोकरीला असताना केळसी या गावी कामा निमित्त गेलो होतो. रस्ता समुद्र किनाऱ्याला लागून होता, दर्गा किनाऱ्यावर होता. केळसीला गेल्यावर तेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास आठवला, तेव्हा मी पीर याकूब बाबांच्या दर्गाल्या भेट दिली. हा पण योगायोगच होता. कोंकणात असताना 300 किलोमीटर मी अनेकदा दुचाकीने मुंबईला जाणे येणे केले. मुंबईला जातांना गोवा – मुंबई महामार्गावरून पोलादपूर, महाड लागायचे, महाडला आले की उजव्या बाजुला एका रोडवर रायगड 24 किलोमीटर असे बोर्ड लावलेले दिसायचे, प्रवास करतांना वाटायचे की एक दिवस दुचाकीने रायगड किल्ल्यावर जायायचे. एक दिवस असाच दुचाकीने मुंबईला जातांना दुपारच्या वेळी रायगड किल्ल्यावर जाण्याचे धाडस केले, रोड चांगला नव्हता, परिसराची जास्त माहिती नव्हती, लवकर पाहणे होईल, नंतर माणगावला जवळचा मार्ग काढुन मुंबईला जावे असे ठरले, रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी गेल्यावर किल्ल्यावर जायायला दोन मार्ग होते, रोपवे आणि पायऱ्या, पायऱ्यांनी दोन तास लागणार होते, त्यामुळे रोपवेची निवड केली, रायगड विस्तीर्ण, किल्ल्याचा विस्तार व उंची मोठी असल्याने पाहायला वेळ पुरला नाही तरी किल्ला पाहून किल्ल्याची माहिती घेतली, परत जातांना सायंकाळ झाली होती. माणगावला जाण्याचा जवळचा मार्ग शोधला, रस्ता माहित नव्हता. जातांना पाचाड गावी काही अंतरावर राजमाता जीजाबाईची समाधी लागली, दर्शन घेतले, याला म्हणतात श्रद्धा आणि योगायोग. कारण समाधी मला माहित नव्हती. नंतर थोडे अंतर गाठून दोन मोठे डोंगर लागले. दोन डोंगराच्या मध्ये खाई होती. रस्ता सुचत नव्हता, खाईतुन पायवाटेने गाडी काढली, परंतु खाईत गाडी बंद पडली, गाडी चालु होत नव्हती. गाडी चालु होईपर्यंत संध्याकाळ झाली होती, नंतर प्रयत्नांती गाडी सुरू झाली. खाईतुन थोडे वर आल्यावर एक गाव दुरुन दिसले, एक बाई डोक्यावर पाण्याचा हंडा घेवून चालली होती तीला माणगावचा रस्ता विचारला, थोड्या वेळाने माणगावचा एक कारागीर भेटला, त्याला सोबत घेवुन माणगावला गेलो, रात्र बरीच झाली होती, त्यामुळे गाडी त्या कारागिरांच्या घरीच ठेवली, एस टी बसने मुंबईला आलो, परत जातांना एस-टी गाडीतून माणगावला उतरलो. ऊतरुन दुचाकी गाडी घेतली व पुढील प्रवासाला निघालो. सांगावयाचे म्हणजे श्रध्देने हे सर्व शक्य झाले. श्रध्देने भवसागर पार करता येते. रायगड किल्ल्याचे क्षेत्रफळ 1200 एकर आहे. रोपवेनी फार कमी लोक जातात, रायगड विकास प्राधिकरणाने किल्ल्याच्या पायथ्याशी जागा घेतली आहे. विकास कामे सुरू आहेत.
अंधश्रद्धेविरुद्ध प्रथम आवाज त्याकाळात शिवाजी महाराजांनी उठविला. जबरदस्तीने धर्मांतर झालेल्यांना पुन्हा सन्मानाने स्वधर्मात घेतले. परधर्मियांचा सुद्धा महाराजांनी आदर केला. शहाजी राजाच्या निधनानंतर राजमाता जिजाऊंना सती जाण्यापासून महाराजांनी रोखले.
*जाणता राजा*
छत्रपती शिवाजी महाराज यांना “जाणता राजा” असे म्हटले जाते कारण ते आपल्या प्रजेला समजून घेणारे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि न्यायाने राज्य करणारे राजे होते.
*प्रजेची काळजी घेणारे राजा*
त्यांनी शेतकरी, व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय होऊ दिला नाही. युद्धाच्या काळातही शेतजमिनींचे संरक्षण केले. शिवाजी महाराजांचे मजबूत आणि नैतिक लष्करी नेतृत्व होते. सैन्याने कठोर शिस्तीचे पालन केले.
*स्त्रियांचा सन्मान*
शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला स्त्रियांवर अत्याचार न करण्याचे कठोर आदेश दिले होते. शत्रू पक्षातील स्त्रियांचाही आदर राखला जावा असे आदेश दिले होते. युद्धादरम्यान पकडलेल्या महिलांना आदराने वागविले जात असे. सुरक्षितता प्रदान करण्यात येत असे. या मानवी दृष्टिकोनामुळे लोक त्यांचा मनापासून आदर करू लागले. कल्याणच्या सुभेदाराची सून चोळी बांगडी करून सन्मानाने परत पाठविली.
*न्यायप्रिय आणि सुयोग्य प्रशासन*
शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन करून शिस्तबद्ध कारभार चालवला. शिस्तबद्ध प्रशासकीय व्यवस्था स्थापन केली. जात-पात न पाहता गुणवंतांना संधी दिली. जात किंवा धर्माच्या नावावर भेदभाव न करता न्याय दिला. जन्मापेक्षा प्रतिभा आणि निष्ठा महत्त्वाची होती. सैन्यात पगारी कर्मचारी नेमले. जहागिरदारी, वतनदारी नष्ट केली. वशिल्याला आळा घातला. शिवाजी महाराजांचे निष्पक्ष आणि न्याय्य प्रशासन होते,
*धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता*
धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे वैशिष्ट्ये होते. शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांचा आदर केला. त्यांच्या सैन्यात व दरबारात विविध धर्मांचे लोक महत्त्वाच्या पदांवर होते. अठरापगड जातींना स्वराज्यात संधी दिली. मस्जिदी मंदिरांना संरक्षण मिळाले. मुस्लिमांना सैन्यात महत्वाच्या पदावर नेमले. या समावेशक राजवटीला विविध समुदायाकडून पाठिंबा मिळाला.
*स्वराज्याची स्थापना*
शिवाजी महाराजांनी कोणतीही साधनसामुग्री नसतांना जिवाभावाची माणसे जोडून स्वराज्याची स्थापना केली. “लाख गेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा सुखरूप राहिला पाहिजे. महाराजांसाठी जीव देणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यामुळे महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले. परकीय आणि जुलमी सत्तेविरुद्ध लढून त्यांनी स्वराज्य उभे केले, जे प्रजेच्या हितासाठी होते. जुलमी राजवटीला शह दिला. परकीय आणि दमनकारी राजवटीपासून रयतेला संरक्षण मिळाले. जुलमी राजवटीपासून लोकांना मुक्त केले आणि स्वराज्याची स्थापना केली.
*निष्कर्ष*
शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर प्रजेचे हित जपणारे, त्यांचे राज्य केवळ राजेशाही सत्ता, किंवा विस्तारापेक्षा सामान्य लोकांच्या कल्याणावर, संरक्षणावर आणि आदरावर केंद्रित होते. न्याय देणारे आणि सर्वांना समान मानणारे राजा होते. म्हणूनच त्यांना प्रेमाने “जाणता राजा” असे संबोधले जाते. शिवाजी महाराजांनी शेतकरी, व्यापारी, महिला आणि सामान्य नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित केले. युद्धाच्या वेळी शेत जमिनीचे रक्षण केले. शेतकरी सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा केली. ज्या काळात अनेक शासक प्रामुख्याने विजयावर लक्ष केंद्रित करत होते, त्या काळात त्यांनी सार्वजनिक कल्याणला प्राधान्य दिले. जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण













