
कंत्राटदाराविरुद्ध अत्याचार व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; आरोपी फरार शोध सुरू
त्रिकांत डांगरे तालुका प्रतिनिधी, अहेरी : मैत्रीचे नाटक करून एका 27 वर्षीय आदिवासी परिचारिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर लग्नाचे वचन देऊन वारंवार अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने पीडितेची जात काढून लग्नास नकार दिला, तसेच तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. खळबळजनक घटना 24 फेब्रुवारी रोजी अहेरीत उघडकीस आली. या प्रकरणी एका कंत्राटदाराविरुद्ध अत्याचार व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून तो फरार झाला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, अभिषेक सतीश आईलवार वय, 30 वर्ष रा. अहेरी असे आरोपीचे नाव आहे. त्याने पीडित तरुणीशी मैत्री केली होती. ” तू मला खूप आवडतेस ” आपण लवकरच लग्न करू असे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. जुलै 2024 ते ऑक्टोबर 2025 या दरम्यान त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे वचन पूर्ण करण्याऐवजी समाजात बदनामी करण्याची भीती घातली आणि बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा ‘तू आदिवासी समाजाची आहेस, तुझी जात वेगळी आहे’, असे म्हणत त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. एवढेच नव्हे तर, पीडितेच्या गर्भधारणेचे सर्व पुरावे आणि कागदपत्रेही त्याने जाळून नष्ट केली.या जाचाला कंटाळून हतबल पीडितेने अखेर अहेरी पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कलम ६९,२४१,३५१(२) भारतीय न्याय संहिता २०२३ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.















