
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर जिल्ह्यातील Tadoba Andhari Tiger Reserve (ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प) परिसरातील लोहारडोंगरी येथे प्रस्तावित खाण प्रकल्पाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने समर्थन जाहीर केले आहे.
पर्यावरण कार्यकर्ते बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील व्याघ्र स्थलांतर मार्ग व जंगल वाचविण्याची मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी बंडू धोत्रे यांना जबरदस्तीने ओढत नेल्याच्या घटनेचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी म्हटले आहे की, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील व्याघ्र स्थलांतर मार्ग हा पर्यावरण आणि वन्यजीवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या भागात खाण प्रकल्प सुरू झाल्यास जंगलाचे मोठे नुकसान होऊन वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल.
पर्यावरण रक्षणासाठी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी दडपशाही करणे ही लोकशाहीविरोधी कृती असून याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष तीव्र निषेध करीत आहे. तसेच लोहारडोंगरी खाण प्रकल्प तात्काळ रद्द करून जंगल व वन्यजीवांचे संरक्षण करावे, अशी मागणीही कॉ. सचिन मोतकुरवार यांनी केली आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ताडोबा परिसरातील जंगल, पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.















