
मीरा-भाईंदर – १९ मार्च २०२६: मीरा-भाईंदर शहरात चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत असून, प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित ‘दिव्य चैत्र नवरात्र उत्सव २०२६’ चा दिमाखदार प्रारंभ झाला आहे. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असून, भाविकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी सहकुटुंब आदिमाया शक्तीची विधिवत स्थापना केली. ‘शैलपुत्री’ देवीच्या पूजनाने नऊ दिवसीय उत्सवाची सुरुवात झाली. मंत्रोच्चार, आरती आणि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे दक्षिणात्य स्थापत्यशैलीवर आधारित भव्य मंदिराचा देखावा. नक्षीकाम केलेले स्तंभ, आकर्षक सजावट आणि उंच गोपूर यामुळे भाविकांना दक्षिण भारतातील मंदिरांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत आहे. गेल्या चार वर्षांपासून हा उत्सव आपल्या भव्यतेसाठी ओळखला जात असून, यंदा पाचव्या वर्षीही नव्या संकल्पनेमुळे उत्सव अधिक उठून दिसत आहे.
चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरू झालेल्या या उत्सवात नऊ दिवस देवीच्या विविध रूपांचे पूजन करण्यात येणार आहे. ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री या रूपांची भक्तिभावाने पूजा, भजन आणि विशेष अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “मीरा-भाईंदरमधील नागरिकांसाठी हा उत्सव म्हणजे एक चैतन्यमय पर्व आहे. चैत्र नवरात्रीच्या पवित्र काळात आई जगदंबेची कृपा सर्वांवर राहो आणि सर्वांचे जीवन सुख-समृद्धीने भरून जावो, हीच प्रार्थना.”
प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने मीरा-भाईंदरमधील सर्व भाविकांना या दिव्य दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564















