prabodhini news logo
Home चंद्रपूर शोकसंदेश – जनसेवा, शिक्षण आणि राजकारणातील थोर नेतृत्व काळाच्या पडद्याआड – आ....

शोकसंदेश – जनसेवा, शिक्षण आणि राजकारणातील थोर नेतृत्व काळाच्या पडद्याआड – आ. किशोर जोरगेवार

0
101

रवि आत्राम तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – गेल्या पाच दशकांपासून राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे माजी खासदार स्व. दत्ताजी मेघे यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नव्हे, तर समाजासाठी आयुष्य वाहून घेतलेला एक दूरदृष्टीचा विचारवंत, मार्गदर्शक आणि खर्या अर्थाने लोकनेता आपण गमावला असल्याची भावना शोकसंदेशाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचा मार्ग तयार करत त्यांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारे नेतृत्व उभे केले. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची निष्ठा या गुणांच्या बळावर त्यांनी लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकी आणि शिक्षण क्षेत्राबद्दलची खोल आस्था दिसून येत होती.
विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी उभारलेले शैक्षणिक संस्थांचे जाळे हे त्यांच्या कार्याचे सर्वात मोठे स्मारक आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विचारावर विश्वास ठेवत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. ग्रामीण व वंचित भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहेत.
अजातशत्रू, संयमी आणि समतोल नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणातील कटुता दूर ठेवत सर्वांशी स्नेहपूर्ण संबंध राखण्याची त्यांची शैली ही त्यांच्या मोठेपणाची साक्ष देणारी होती. त्यांच्या कार्यातून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील, याबाबत शंका नाही. आज त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अत्यंत कठीण आहे. समाज, शिक्षण क्षेत्र आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांना त्यांच्या जाण्यामुळे मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्यांनी दिलेली मूल्ये, विचार आणि कार्याचा वारसा हा पुढील पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरेल. असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here