
तिवसा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : राज्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांवर बसत आहे. वाढती किंमत आणि बुकिंग कालावधीतील वाढ यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच परिस्थितीत एक दुर्दैवी अपघाताची घटना तिवसा तालुक्यात उघडकीस आली आहे.
टाकरखेडा पूर्णा येथील अंकुश पांडुरंग अमझरे (वय २७) यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ही घटना सार्सी–तिवसा मार्गावर सोमवारी रात्री सुमारे ९ वाजता घडली. मात्र, त्यांचा मृतदेह दोन दिवसांनंतर बुधवारी आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हे रिकामे गॅस सिलिंडर घेऊन भारसवाडा येथील आपल्या जावयाकडे जात होते. त्यांच्या जावयाकडे गॅस एजन्सी असल्याने ते सिलिंडर भरण्यासाठी निघाले होते. दरम्यान, प्रवासात त्यांचा मोबाईल हरवला. त्यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरून कुटुंबीयांशी संपर्क साधून ही माहिती दिली होती.
यानंतर एका वळणावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. दुचाकी घसरल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कुटुंबीयांना ते जावयाकडे पोहोचल्याचा समज करून घेतला होता. मात्र, संपर्क न झाल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर बुधवारी जंगलातून जात असलेल्या नागरिकांना रस्त्यालगतच्या खड्यात दुचाकीसह त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह तिवसा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला.
दरम्यान, राज्यात गॅस सिलिंडर टंचाई नसल्याचा दावा सरकारकडून केला जात असला, तरी विविध भागांतून टंचाई आणि वाढत्या दरांबाबत तक्रारी समोर येत आहेत. अकोला येथेही घरगुती गॅस समस्येमुळे एका माजी सरपंचाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने गॅस पुरवठा आणि दरवाढीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.















