prabodhini news logo
Home एटापल्ली येरदळमी येथील बंद सौर नळ त्वरित दुरुस्त करण्याची मागणी-CPI

येरदळमी येथील बंद सौर नळ त्वरित दुरुस्त करण्याची मागणी-CPI

0
56

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – ग्रामपंचायत गट्टा अंतर्गत येत असलेल्या येरदळमी गावातील श्री. रामचंद्र लेकामी यांच्या घरासमोरील सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी नळ मागील काही महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. यामुळे गावातील आदिवासी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या समस्येबाबत गावातील आदिवासी नागरिकांनी कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे धाव घेऊन मदत मागितली. नागरिकांची कैफियत जाणून घेतल्यानंतर हा नळ तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकपा) जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सध्या उन्हाळा सुरू असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत गावातील पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेला हा सौर नळ बंद असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. येथील महिला व नागरिकांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असून, वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाईची समस्या अधिकच गंभीर बनली आहे.
याबाबत बोलताना कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले की, “येरदळमी येथील नागरिक आधीच अनेक समस्यांचा सामना करत आहेत, त्यात भर म्हणून गेल्या काही महिन्यांपासून हा नळ बंद आहे. गावातील नागरिकांनी या अडचणीबाबत मला माहिती देऊन सहकार्याची विनंती केली आहे. उन्हाळ्याची तीव्रता पाहता प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. रामचंद्र लेकामी यांच्या घरासमोरील या नळाची तांत्रिक दुरुस्ती करून तो लवकरात लवकर कार्यान्वित करावा, जेणेकरून येथील आदिवासी बांधवांना दिलासा मिळेल. जोपर्यंत या नळाची दुरुस्ती होऊन येथील पाणी प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत आम्ही याचा सतत पाठपुरावा करत राहू.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here