
जगी सर्व सुखी असा कोण आहे…?
विचारी मना तूच शोधुनी पाहे..
मनुष्य जन्माला येतो,आणि समज आल्याबरोबरच त्याच्या मनात एक अदृशशोध सुरू होतो.तो म्हणजे…*”सुखाचा शोध*”. प्रत्येक जण आपल्या परीने सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो.
कोणी पैशात सुख शोधत असतो.कोणी नात्यात,तर कोणी यशात,तर कोणी नोकरीत.पण खरे सुख नेमके कुठे आहे. हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.
सुख ही बाह्य गोष्ट नसून ती आपल्या मनाची अवस्था आहे मन समाधानी असेल तर लहान सहान गोष्टीमध्ये ही आनंद मिळतो.पण मन अस्थिर असेल तर मोठ्या संपत्तीनेही समाधान मिळत नाही.म्हणूनच म्हणतात…
सुख हे नसते वस्तूमध्ये,
ते असते आपल्या मनामध्ये,
समाधानाच्या छोट्या क्षणात,
आनंद फुलतो जीवनात…..
आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस सुखाच्या शोधात इतका गुंतला आहे की,त्याला वर्तमानातील आनंदच दिसेनासा झाला आहे.भविष्यातील स्वप्नांसाठी तो वर्तमानातील हसू गमावतो.त्यामुळेच सुखाचा शोध घेताना आपण आपल्या आजूबाजूच्या छोट्या मोठ्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो.
उद्याच्या आशेने जगताना,
आजचा क्षण हरवतो,
हास्याच्या त्या छोट्या लहरीत,
खरा आनंद दडलेला असतो.
दडलेला असतो.
सुख म्हणजे केवळ पैसा नाही.पैसे आवश्यक आहे पण ते सर्वस्व नाही.अनेक श्रीमंत लोकही असमाधानी असतात.तर काही गरीब माणस ही आनंदाने जीवन जगतात.कारण सुखाचा संबंध संपत्तीशी नसून समाधानाशी आहे.
सोन्याच्या पिंजऱ्यात बसला पक्षी,
मुक्त आकाशासाठी रडतो,
तसाच श्रीमंत माणूस ही
सुखासाठी भटकत राहतो.
नातेसंबंध ही देखील सुखाची मोठी साधना आहे.कुटुंबातील प्रेम,मित्रांची साथ,आपुलकीचे शब्द.. हे सगळे मनाला आनंद देतात.तेव्हा आपण इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधतो.तेव्हा खऱ्या सुखाची अनुभूती होते.
नात्याच्या या उबदार छायेत,
मनाला मिळतो विसावा,
प्रेमाच्या त्या दोन शब्दात,
सुखाचा सापडतो खरा ठेवा.
याशिवाय इतराना मदत करण्यातही एक वेगळं सुख असतं.एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं,त्याच्या अडचणीत त्याला साथ देणं..यामुळे आपल्याला ही समाधान मिळते. हेच खरे निस्वार्थ सुख आहे.
दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसताना,
आपले दुःख हरवून जाते,
सेवेच्या त्या छोट्याशा कृतीत,
सुखाची गोड चव मिळते.
निसर्गातही सुख दडलेले आहे.हिरवीगार झाडं,पक्ष्यांचा किलबिलाट,वाहणारा वारा, हे सगळं मनाला शांतता देतं.आपण थोडा वेळ निसर्गासोबत घालवला तर आपोआप मन प्रसन्न होतं.
निसर्गाच्या या सानिध्यात
मन हरवून जातं
शांततेच्या त्या लहरीत
सुख हळूच सापडते…
शेवटी असं लक्षात येते.सुखाचा खरा शोध बाहेर नाही, आपल्या आत आहे.आपण स्वतःला ओडखले ,आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवल्या आणि जे आहे त्यात समाधान मानलं,तर खऱ्या सुखाचा अनुभव येतो.
शोध सुखाचा बाहेर नको,
तो तुझ्याच अंतरात आहे.
समाधानाच्या त्या छोट्याशा ठिणगीत,
जीवनभराचा आनंद दडलेला आहे.
अशाप्रकारे सुखाचा शोध म्हणजे स्वतःच्या मनाशी केलेला एक सुंदर प्रवास आहे.या प्रवासात आपण जितके स्वतःला समजून घेतो, तितकंच सुख आपल्या जवळ येतं.
त्यामुळे बाह्य गोष्टीमध्ये सुख शोधण्याऐवजी आपल्या मनाच्या समाधानाला जागे करू या.कारण खरं सुख आपल्या अंतर्मनातच दडलेले आहे.
जगी सर्व सुखी असा कोण आहे…
विचारी मना तूच शोधुनी पाहे…?
लेखन
कु.उषा रामाजी ढोके (सौ.भुरे)
ब्रम्हपुरी















