
निसर्गाशी माणसाचे नाते हे पुर्वीपासून आहे.
त्यातल्या त्यात आपण जर खेड्यातील असू तर निसर्गाशी
तेथील असलेल्या, पायवाट, सडक, हमरस्ता यांच्याशी
माणूस एकरूप झालेला असतो. निसर्गाशी, त्या वाटेशी जुळलेले नाते म्हणजे आयुष्याच्या देवान घेवानसाठी जणू जुळलेले ऋणानुबंधच मानावे लागतील. त्या वाटेची झाडे झुडपे वेली नदी ,नाले ,पुल, ओढा जणू आपल्या जिवाभावाची होऊन जाते वाटेला भेटलेली एखादी आंबराई , किंवा मोठं गर्दागोल कडूलिंबाचं झाड भर उन्हात जो जिव्हाळ्याचा थंडावा देते त्या वृक्षाची व्यापक कथा व हमरस्त्यामुळे मिळालेले त्याला महत्व काटेसावर किंवा वटवृक्ष, वेलीने वाढवलेले हमरस्त्याचे सौंदर्य मनाला एक वेगळी भुरळ घालून जाते, परंतु आजकाल ही वाट निसर्गाच्या सानिध्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शेतातून रानात जाणारा तो मार्ग पायदळ रस्ता सिमेंटच्या रस्त्यामुळे दुर्लक्षित झाला आहे. या वाटा म्हणजे मानवी संपर्क लहान मुलांची खेळण्यासाठी जागा आणि निसर्गाशी जोडलेली एक साखळी होती ती आता शहराच्या वाढीमुळे अदृश्य झाली आहे . या वाटा झाडाझुडपांतून नदी नाल्याच्या कडेने जायच्या ज्यामुळे मानवाचे निसर्गाशी थेट नाते असायचे. याच वाटेवरून बालपणी शाळेत जाताना खेळायला जाताना बालपणीच्या मैत्रीच्या गोड आठवणी हरवल्या आहेत. गावामध्ये आता सिमेंटचे रस्ते आल्यामुळे जुण्या मातीच्या चिंचोळ्या पाऊल वाटा लुप्त झाल्या आहेत.
दोनचार फुटाच्या या वाटेवरून चालताना मिळणारी शांतता आणि एकांत दुर्मिळ झाला आहे ही हरवलेली पाऊल वाट म्हणजे केवळ एक रस्ता नसून तो निसर्ग माणूस बालपण झाडाझुडपाशी साधलेला संवाद आणि दुवा आहे. रस्त्याशी असलेले नातेसंबंध जीवनाच्या प्रभावाचे एक रूपक आहे. जिथे चढ उतार वळणे व अनपेक्षित थांबे निसर्गाशी नाते घट्ट करण्यास मदत करते. वाटेच्या कडेला विसावलेल्या सावलीचा गारवा आजही मनाला मोहीत करते व त्या वाटेने परिचित रूप ओघवत्या काळासंगे ओसरले असली त्या वाटेची अनुभुती भूतकाळात नेवून थांबवते.
नंदा भगत /कारंजा लाड
वाशिम















