
कांदळवनावरील अवैध झोपड्यांना प्रशासनाचे अभय ?
मंत्री प्रताप सरनाईक यांची घटनास्थळी धाव; अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल!
भाईंदर पूर्व : भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक फेज ३ परिसरात काल रात्री सिलेंडर स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना केवळ अपघात नसून महापालिका प्रशासन आणि महसूल विभागाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री Pratap Baburao Sarnaik यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करत, त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत, “प्रशासकीय ढिसाळपणामुळे सामान्य नागरिकांचा बळी जाऊ देणार नाही. इंद्रलोक परिसरातील अवैध साम्राज्य मुळासकट उखडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला.
प्रशासनाच्या नाकाखाली भूमाफियांचे रॅकेट?
सदर परिसर हा कांदळवन (Mangroves) क्षेत्रात येत असून येथे कोणत्याही प्रकारच्या बांधकामास परवानगी नसतानाही भूमाफियांनी बेकायदेशीर झोपड्या उभारल्याचा आरोप आहे. कमलेश गुप्ता नावाच्या व्यक्तीकडून गरिबांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी बेकायदेशीर बोअरवेल, वीज जोडणी तसेच मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर साठा ठेवण्यात आला होता. तब्बल २३ सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात मोठे नुकसान झाले.
अधिकाऱ्यांना सुनावले ‘खडेबोल’
या घटनेवर संताप व्यक्त करत मंत्री सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त आणि स्थानिक तहसीलदार यांची कडक शब्दांत कानउघडणी केली. “वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच ही दुर्घटना घडली,” असे म्हणत त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व अवैध बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.
घुसखोरीच्या संशयावरून पोलिसांना सूचना
या घटनेतील मृत व्यक्ती बाहेरगावचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, घुसखोरीच्या शक्यतेचा देखील तपास करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. शहरातील बेकायदेशीर झोपडपट्ट्यांची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
mojissports@gmail.com
8104170564















