prabodhini news logo
Home चंद्रपूर गरजू विद्यार्थ्यांना आधार ठरली “अम्मा की पढ़ाई”; १३ जण पोलीस सेवेत

गरजू विद्यार्थ्यांना आधार ठरली “अम्मा की पढ़ाई”; १३ जण पोलीस सेवेत

0
75

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात सुरू करण्यात आलेल्या “अम्मा की पढ़ाई” उपक्रमाने आणखी एक उंची गाठली असून सदर शिक्षण केंद्रातील १३ विद्यार्थ्यांची पोलीस दलात नियुक्ती झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीत त्यांनी हे यश प्राप्त केले आहे
गरिब व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेला “अम्मा की पढ़ाई” हा उपक्रम सध्या चंद्रपूर शहर व परिसरात अत्यंत प्रभावी ठरत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आशेचा किरण बनला असून अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत आहे.
या उपक्रमांतर्गत सध्या २८४ विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचे शिक्षण घेत असून त्यांना तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून उच्च दर्जाचे मार्गदर्शन दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासक्रमाबरोबरच नियमित टेस्ट, मार्गदर्शन सत्रे, तसेच मुलाखत व शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना पूर्णपणे निशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
अनेक विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या स्वप्नांपासून दूर राहतात. मात्र “अम्मा की पढ़ाई” या उपक्रमामुळे अशा विद्यार्थ्यांना सक्षम व्यासपीठ मिळाले आहे. अभ्यासासाठी योग्य वातावरण, मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असून ते स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करत आहेत.
या शिक्षण केंद्राच्या यशाचा ठोस परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. यापूर्वीही या केंद्रातील अनेक विद्यार्थी विविध शासकीय सेवांमध्ये रुजू झाले आहेत. विशेषतः नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत या केंद्रातील तब्बल १३ विद्यार्थ्यांनी यश मिळवत पोलीस दलात प्रवेश केला आहे. ही बाब या उपक्रमाच्या यशाची साक्ष देणारी ठरली आहे.
या यशाबाबत बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, “गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाले तर ते नक्कीच मोठे यश संपादन करू शकतात. ‘अम्मा की पढ़ाई’ हा उपक्रम त्यांच्यासाठी एक मजबूत आधार ठरत असून, भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, शिक्षण हीच खरी शक्ती असून समाजाच्या प्रगतीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याची संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
“अम्मा की पढ़ाई” हा उपक्रम केवळ शिक्षण देणारा नाही, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारा आणि त्यांना आत्मनिर्भर बनविणारा उपक्रम ठरत आहे. या उपक्रमातून घडणारे यशस्वी विद्यार्थी भविष्यात समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “अम्मा की पढ़ाई” हा उपक्रम आज चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक उन्नतीचा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. पूजा मांदाडे, ऐश्वर्या ढवस, वैष्णवी कारसोपरे, रविना मेश्राम, अश्विनी साळवे, वैभव चौधरी, भाग्यश्री बुच्चे, अक्षय कुमरी, विलास राठोड, सानिका गुडपल्ले, मिलिंद घवारे, संदीप पेडडिंटी, भूमेश्वर कन्नमवार अशी पोलीस दलात नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

*130 मार्क घेत जिवती सारख्या दुर्गम भागातील विलास राठोड वीजे ए गटात जिल्हात प्रथम*

जिवतीसारख्या अतिदुर्गम भागातून पुढे येत विलास राठोड या विद्यार्थ्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर यशाची नवी उंची गाठली आहे. तब्बल १३० गुण मिळवत त्याने वीजे (A) गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आर्थिक व भौगोलिक अडचणी असूनही त्याने हार न मानता सातत्याने अभ्यास सुरू ठेवला.

“अम्मा की पढ़ाई” शिक्षण केंद्र सुरू झाल्यापासून विलास नियमितपणे येथे उपस्थित राहून अभ्यास करत होता. तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, योग्य दिशा आणि स्वतःची मेहनत याच्या बळावर त्याने हे यश संपादन केले आहे. त्याचे यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य संधी मिळाल्यास ते मोठे यश मिळवू शकतात, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here