prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपुरात आंबेडकर जयंती उत्सवाला गालबोट; डीजेवर नाचताना झालेल्या वादातून युवकाची हत्या

चंद्रपुरात आंबेडकर जयंती उत्सवाला गालबोट; डीजेवर नाचताना झालेल्या वादातून युवकाची हत्या

0
131
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असताना चंद्रपुरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगळवारी (१४ एप्रिल २०२६) रात्री उशिरा गांधी चौकात काढण्यात आलेल्या रॅलीत डीजेवर नाचताना झालेल्या क्षुल्लक वादाचे रूपांतर हत्येत झाले. या घटनेत रविकांत टेंभूरकर (३६ वर्षे) या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरातील विविध भागांतून भव्य रॅली काढण्यात आल्या होत्या. रात्री ११:३० वाजेच्या सुमारास इंदिरा नगर येथील ‘भीमरत्न बहुउद्देशीय युवा संस्थेची’ रॅली गांधी चौकात पोहोचली. रॅलीमध्ये डीजेच्या तालावर अनेक युवक नाचत होते. नाचताना एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून काही तरुणांमध्ये वाद सुरू झाला आणि प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले.
रविकांत टेंभूरकर हा तरुण हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेला असता, आरोपींनी त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात रविकांत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई:
या हल्ल्यात अनिकेत गलबले नावाचा आणखी एक युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून या प्रकरणी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या हत्येमागे जुने वैमनस्य असल्याचेही बोलले जात आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे जयंतीच्या उत्साहावर विरजण पडले असून शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here