
पुणे प्रतिनिधी : लग्न जमत नसल्याच्या कारणावरून एका तरुणाने थेट “पोलिस अधिकारी” असल्याचे खोटे भासवून लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे रोड परिसरातील श्रेयकेश राजू जाधव (वय २६) यांनी स्वतःची पुणे शहर पोलिसांत निवड झाल्याचे भासवण्यासाठी बनावट फ्लेक्स लावले. तसेच पोलिस वर्दीतील फोटो काढून ते सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट करत “इम्प्रेशन” निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, हा प्रकार खऱ्या पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. चौकशीत संबंधित तरुणाने लग्नासाठी मुलींवर प्रभाव पडावा या उद्देशाने हा सर्व बनाव केल्याची कबुली दिल्याचे समजते.
या प्रकरणी नऱ्हे पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.















