
एटापल्ली प्रतिनिधी : तालुका एटापल्ली अंतर्गत ग्रामपंचायत मेंढरी येथील ओडसा टोला येथे मागील अंदाजे एक वर्षापासून वीज ट्रान्सफॉर्मर खराब स्थितीत असल्यामुळे संपूर्ण वस्ती अंधारात आहे. यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, तात्काळ वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे.
गावकऱ्यांनी वीज वितरण कार्यालय, एटापल्ली येथे अनेक वेळा तोंडी तक्रारी दिल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून, दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेती व इतर कामांनाही मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, गावातील नागरिकांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार (गडचिरोली) यांनी गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन शासन व प्रशासनाकडे तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, महिलांना या समस्येचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. अंधारामुळे जेवण बनवणे, घरकाम करणे अत्यंत कठीण झाले असून रात्रीच्या वेळी सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
यामुळे संतप्त नागरिकांसह भाकपाने खराब ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करावा किंवा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून मेंढरी (ओडसा टोला) येथे त्वरित वीजपुरवठा सुरू करावा, अशी ठाम मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.















