prabodhini news logo
Home चंद्रपूर पालकमंत्र्यांनी केली ऑनलाईन पध्दतीने स्वयंगणना

पालकमंत्र्यांनी केली ऑनलाईन पध्दतीने स्वयंगणना

0
60

1 मे रोजी जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ

इतरांनीही स्वयंगणना करण्याचे आवाहन

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 02 : सन 2011 नंतर तब्बल 15 वर्षांनी होणारी जनगणना, ही पहिली डिजीटल जनगणना आहे. यात नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे रोजी जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनीसुध्दा जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे ऑनलाईन पध्दतीने स्वयंगणना करून या राष्ट्रीय कार्याचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत उपस्थित होत्या.

1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना se.census.gov.in या संकेतस्थळावर स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल ओटीपीने लॉगिन केल्यानंतर नकाशावर घर दाखवून माहिती भरावयाची आहे. यात पत्ता, सुविधा, कुटुंबाची माहिती असे सरळसोपे 33 प्रश्न आहेत. सदर माहिती 16 भाषांमध्ये भरण्याची सुविधा असून आपण मराठीतसुध्दा माहिती भरू शकतो. माहिती भरू सबमीट केल्यानंतर एस.ई. आयडी क्रमांक येतो. तो क्रमांक 15 मे नंतर घरी आलेल्या प्रगणकांना दाखवायचा आहे. भरलेली माहिती ही 100 टक्के गोपनीय आहे.

स्वयंगणना केल्यानंतर पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, मी स्वत: महाराष्ट्रदिनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वयंगणना केली आहे. आजपासून (दि.1) महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात जनगणनेच्या कार्याचा शुभारंभ होत आहे. 1 ते 15 मे या कालावधीत नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या कालावधीत आपल्या वेळेनुसार स्वयंगणना करावी, तसेच या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here