
नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथील विद्यामंदिर परिसरात भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीत तब्बल ५० पेक्षा अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी अचानक लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग वेगाने पसरत गेली आणि अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने जीवितहानीबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.















