prabodhini news logo
Home कोरची कोरची आश्रम शाळेचा दणदणीत निकाल; चार वर्षांपासून सलग शंभर टक्के निकालाची परंपरा...

कोरची आश्रम शाळेचा दणदणीत निकाल; चार वर्षांपासून सलग शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.

0
14

कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, कोरची येथील विद्यार्थ्यांनी यंदाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा निकाल शंभर टक्के लावला आहे. विज्ञान व कला या दोन्ही शाखांमध्ये मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे, शिक्षण विभागाच्या ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत कडक अंमलबजावणी असतानाही कोरची आश्रम शाळेने सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे या यशाला अधिकच मानाचे पंख लाभले आहेत.
या यशामागे आदिवासी विकास विभाग नागपूर येथील अप्पर आयुक्त मा. आयुषी सिंह (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शन, प्रकल्प अधिकारी अरुण एम. (भा.प्र.से.), सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) वैद्य शेख, तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) डॉ. प्रभुजी सादमवार व नरेंद्र कावळे यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. यासोबतच शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकवृंदाने घेतलेली मेहनतही या यशाची प्रमुख कडी ठरली.
यंदा विज्ञान शाखेतून ४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी श्रुती चंदनखेडे हिने ६८% गुणांसह तालुका व शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. योगिनी शेंडे (६५.३३%) द्वितीय, तर चांदणी मडावी (६०%) तृतीय क्रमांकावर राहिली. विशेष म्हणजे ३५ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवून उत्तीर्णतेचा उच्च दर कायम ठेवला.
कला शाखेतून ४५ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. अमित्रा कांटेगे हिने ७०.५०% गुणांसह तालुक्यात तृतीय येत शाळेत प्रथम स्थान पटकावले. शालिनी कमरो (६७.१७%) द्वितीय, तर माहेश्वरी हारमे तृतीय क्रमांकावर राहिली.तर पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत छत्तीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरालाल ऊईके, तसेच शिक्षक भैयालाल कुरसंगे, हरीश कामडी, अरुण कायंदे, मनोज गजभिये, धनश्री परतेती, प्रमोद शंभरकर, अभिमन्यू वाटगुरे, राहुल अंधारे, कृष्णा गावडे, संतोष सहारे, अमित मेश्राम, यंगलवार, प्रथमेश पाटोळे, कन्नाके आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कोरची आश्रम शाळेचा हा यशस्वी प्रवास ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाला नवी दिशा देणारा ठरत असून, ‘मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न’ यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here