
मीरा-भाईंदर : आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. जनगणनेतील पहिला टप्पा असलेल्या हाऊस लिस्टिंग व हाउसिंग सेन्सस प्रक्रियेची तयारी वेगाने सुरू असून, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त यांनी आज प्रशिक्षण सत्राला प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जनगणना प्रक्रियेमध्ये अचूकता, पारदर्शकता आणि जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.
महानगरपालिकेकडून या राष्ट्रीय उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली असून, सुमारे २०६६ प्रगणक व ३४६ पर्यवेक्षक कार्यरत राहणार आहेत. त्यांना सुसज्ज करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रत्यक्ष माहिती संकलन, डिजिटल प्रणालींचा वापर, तसेच डेटा नोंदणी व पडताळणी प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन दिले जात आहे.
जनगणना २०२७ ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणारी जनगणना ठरणार असून, नागरिकांसाठी स्व-नोंदणी (Self Enumeration) सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मीरा-भाईंदर क्षेत्रात ही प्रक्रिया फेब्रुवारी २०२७ ते मार्च २०२७ या कालावधीत पार पडणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून या संपूर्ण प्रक्रियेसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ व सक्षम यंत्रणा उभारण्यात आली आहे. या जनगणनेतून मिळणारी अचूक माहिती शासनाच्या विविध योजना आणि विकासात्मक निर्णयांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
*मोजीस परमार*
*विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे*
*प्रबोधिनी न्यूज नेटवर्क*
📧 *mojissports@gmail.com*
📞 *8104170564*















