prabodhini news logo
Home चंद्रपूर आदिवासी समाजाच्या विकासासाठी कायम अग्रेसर

आदिवासी समाजाच्या विकासासाठी कायम अग्रेसर

0
30

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

गोंडवाना गोटूल पेनठाणा देवाळा स्थापनादिनानिमित्त गोंडी नृत्य सांस्कृतिक स्पर्धा

आ. मुनगंटीवार यांनी केली देवाळा गावासाठी रुग्णवाहिकेची घोषणा ; आदिवासी सभागृहाचे काम तात्काळ सुरू करण्याची दिली ग्वाही

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – देशाच्या प्रगतीमध्ये आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करून झेंडा गाडला. आदिवासींमध्ये एकलव्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे आदिवासींच्या सेवेचा कुठलाही विषय असला तरीही मी तातडीने मदत करत असतो. आदिवासी समाजाच्या विकासासाठी मी कायम अग्रेसर असतो, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

देवाळा (मोहुर्ली), ता. भद्रावती (जि. चंद्रपूर) येथील गोंडवाना गोटूल पेनठाणा देवाळा यांच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित गोंडी नृत्य सांस्कृतिक स्पर्धा २०२६ कार्यक्रमाला आ. श्री. मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, आदिवासी समाजाचे नेते शुभम गेडाम, भाजपा नेते रामपाल सिंह, परमेश्वर मडावी, डॉ. साची बंग, प्रभाकर कोरवते, संतोष पेन्दोर, सुनिता कातकर, बिरेंद्र सिंग ठाकूर, मनीष सिद्धू यांच्यासह आदिवासी भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. अनवाणी पायांनी आदिवासी भगिनी स्वागतासाठी आल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी देवाळा गावासाठी सुसज्ज रुग्णवाहिका देण्याची घोषणा आमदार मुनगंटीवार यांनी केली. तसेच मंजूर २० लक्ष रुपयांच्या आदिवासी सभागृहाचे काम लवकरात लवकर सुरू होईल, असे आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी आश्वस्त केले.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले, “या दुर्गम भागातील एखादी व्यक्ती अचानक आजारी पडल्यास तिला प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत वेळेत पोहोचविणे ही मोठी समस्या ठरते. योग्य वेळी उपचार मिळाले तर अनेकांचे प्राण वाचू शकतात. तसेच जंगल परिसर असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनाही घडतात. अशा वेळी जखमी व्यक्तीला तातडीने चंद्रपूरसारख्या मोठ्या रुग्णालयात हलविण्यासाठी सक्षम व्यवस्था आवश्यक आहे. गावात वाहतुकीची साधने मर्यादित आहेत. बसेस उपलब्ध असल्या तरी आपत्कालीन परिस्थितीत त्या पुरेशा ठरत नाहीत. त्यामुळे या गावासाठी पुढील काही दिवसांत सुसज्ज रुग्णवाहिका देण्याची घोषणा मी करीत आहे.”

आमदार मुनगंटीवार म्हणाले, “गावाच्या विकासासाठी रस्ते, सभागृह, रुग्णवाहिका अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मात्र केवळ पायाभूत सुविधा निर्माण करून चालणार नाही, तर आदिवासी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणेही तितकेच आवश्यक आहे. तरुणांच्या हाताला काम मिळाले, त्यांना स्वावलंबी बनण्याची संधी मिळाली, तरच खऱ्या अर्थाने समाजाचा विकास होईल.”

“मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असताना आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्यातील क्षमता मोठ्या व्यासपीठावर यावी, यासाठी नामांकित व दर्जेदार शाळांमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्यात आला. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार आहे, या भावनेतून हे पाऊल उचलण्यात आले.तसेच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या बांधवांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांच्या श्रमाला योग्य न्याय मिळावा यासाठी तेंदूपत्त्याच्या बोनसामध्ये वाढ करण्यात आली. आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्रपणे ५ टक्के निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही महत्त्वपूर्ण ठरला. या निधीतून अनेक विकासकामांना गती मिळाली आणि दुर्गम भागांमध्ये मूलभूत सुविधांची उभारणी करण्यास मदत झाली.आदिवासी संस्कृती, परंपरा आणि इतिहास जपण्यासाठी ‘राणी हिराई महोत्सवा’ला शासकीय स्तरावर मान्यता मिळवून देत तो शासनाच्या माध्यमातून साजरा करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. आदिवासी समाजाचा गौरवशाली वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, हा त्यामागील उद्देश होता, असे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

पुढे म्हणाले,शबरी आवास योजनेत सुरुवातीला शहरांचा समावेश नव्हता. मात्र शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबांनाही घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर १५ जानेवारी २०२४ रोजी शहरातील आदिवासी कुटुंबांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय अनेक कुटुंबांसाठी दिलासा देणारा ठरला. आदिवासी समाज जंगल, जल, जमीन आणि निसर्गाशी जोडलेले समाज आहे. निसर्गाची पूजा करणे ही समाजाची परंपरा आहे. ‘जय सेवा’ हे फक्त घोषवाक्य नसून, समाजासाठी समर्पित जीवन जगण्याची प्रेरणा आहे. सेवा, संस्कार आणि समाजहित या मूल्यांवर चालत आदिवासी समाजाचा सन्मान, स्वाभिमान आणि विकास अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे,” असेही आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here