
ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये ख्रिस्तानंद स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, ब्रम्हपुरी येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी चि. पुरब हरेश कामडी याने उल्लेखनीय यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र ठरत आपल्या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेसाठी पुरब याने अत्यंत जिद्द, चिकाटी आणि नियमित सरावाच्या जोरावर तयारी केली होती. दररोज प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव, अभ्यासातील सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर त्याने हे यश मिळविले. अल्पवयातच अभ्यासू वृत्ती आणि मेहनतीच्या जोरावर त्याने इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
पुरबच्या या यशामुळे कामडी परिवारासह ख्रिस्तानंद स्कूलमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षकांनीही त्याच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शाळेचे शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.















