prabodhini news logo
Home चंद्रपूर बोकडडोह येथे धम्मदिक्षा दिनानिमित्त भव्य बौद्ध धम्म परिषद व संविधान जागर समारोह

बोकडडोह येथे धम्मदिक्षा दिनानिमित्त भव्य बौद्ध धम्म परिषद व संविधान जागर समारोह

0
9

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – नागभिड तालुक्यातील बोकडडोह येथील ऐतिहासिक व पवित्र दिक्षाभूमीवर दिनांक २२ मे २०२६ रोजी शुक्रवारला भव्य बौद्ध धम्म परिषद व संविधान जागर समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. फुले आंबेडकर स्मारक समिती, बुद्ध विहार दिक्षाभूमी बोकडडोह ग्राम पंचायत ओवाळा, ता. नागभिड, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पवित्र स्थळी दिनांक २२ मे १९५९ रोजी शुक्रवारला माननीय भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील इच्छुक जनतेला बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली होती. त्या ऐतिहासिक घटनेमुळे या भूमीला “दिक्षाभूमी” म्हणून विशेष ओळख प्राप्त झाली. तेव्हापासून येथे दरवर्षी धम्म प्रबोधन व सामाजिक जागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सन १९९४ पासून या कार्यक्रमांचा वारसा फुले आंबेडकर स्मारक समिती सातत्याने पुढे नेत आहे.
यावर्षीच्या कार्यक्रमात पूज्य भन्ते महाथेरो डॉ. धम्मसेवक, सोनी पहाडी, लाखांदूर जिल्हा भंडारा तसेच भन्ते सत्यपाल, प्रेरणाभूमी बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर यांचे बौद्ध धम्मावरील विचारधन उपस्थितांना लाभणार आहे. तसेच लोकसभा चिमूर निर्वाचन क्षेत्राचे खासदार मान. डॉ. नामदेवराव किरसान आणि विधानसभा चिमूर निर्वाचन क्षेत्राचे आमदार मान. बंटीभाऊ भांगडीया यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे, संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन सोसायटी, ब्रम्हपुरी भूषविणार आहेत. यावेळी ॲड. डॉ. मिलिंद जीवणे, राष्ट्रीय अध्यक्ष सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल, प्रा. प्रभाकरजी कोंडबत्तूनवार, कार्यकारी संपादक मराठा मार्ग, प्रा. भूपेंद्र गणवीर, समन्वयक व्हॉईस ऑफ महाराष्ट्र तसेच सामाजिक कार्यकर्त्या मा. वर्षा नांदगावे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे.
कार्यक्रमात परिसरातील वैद्यकीय सेवा देणारे तज्ज्ञ डॉक्टर, शैक्षणिक सेवा-सुविधा पुरविणारे शाळा संचालक, प्रशासकीय अधिकारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात निर्माता-दिग्दर्शक हिरा गेडाम, भंडारा यांच्या तिस कलावंतांच्या समूहामार्फत “महासूर्याची संघर्षगाथा” हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर करण्यात येणार आहे. तसेच सन २०२५-२६ चा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या डॉ. गायत्री रामटेके, बल्लारपूर या “मी सावित्री बोलतेय…” या प्रभावी सादरीकरणातून समाजप्रबोधन करणार आहेत.
या भव्य कार्यक्रमास बहुसंख्य जनतेने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव ॲड. डॉ. पी. डी. काटकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here