Home चंद्रपूर मासेमारीचा नाद जीवावर बेतला; जामसाळा येथे तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

मासेमारीचा नाद जीवावर बेतला; जामसाळा येथे तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

0
161

सिंदेवाही प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा येथे मासेमारी करताना विजेचा धक्का लागल्याने एका ४२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल देवाजी दांडेकर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी राहुल आपल्या काही साथीदारांसोबत गावातील नाल्यावर मासेमारी करण्यासाठी गेला होता. मासे पकडण्यासाठी पाण्यात इलेक्ट्रिक केबलद्वारे करंट सोडला असताना, अचानक राहुलला विजेचा जोरदार झटका बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, घटना घडल्यानंतर राहुलसोबत असलेले त्याचे मित्र मदतीसाठी न थांबता तिथून निघून गेले, अशी चर्चा गावात सुरू आहे.
रात्रीच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, राहुलसोबत नेमके कोण होते की एकटा गेला होता याचा शोध घेतला जात आहे. मासेमारीच्या चुकीच्या पद्धतीमुळे एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने जामसाळा गावात शोककळा पसरली असून दांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here