
बालप्रतिभा कु. श्रेयांका श्रेयस कुलकर्णीचा गौरवशाली प्रवास
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, मुंबई : संस्कृत भाषेचे संवर्धन आणि भारतीय संस्कृतीचे जतन यासाठी मोठमोठे प्रयत्न केले जात असताना अवघ्या पाचव्या वर्षीच्या एका चिमुरडीने आपल्या असामान्य स्मरणशक्ती, अभ्यासू वृत्ती आणि संस्कृतप्रेमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दादर येथील बालमोहन विद्यामंदिरमध्ये ज्युनिअर केजीमध्ये शिक्षण घेणारी कु. श्रेयांका श्रेयस कुलकर्णी हिने अत्यंत लहान वयात संपूर्ण रामरक्षा स्तोत्राचे संस्कृतमधील ३८ श्लोक केवळ ५ मिनिटे २ सेकंदांत म्हणून अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस,आशिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि प्रेस्टिजियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस यांनी घेतली असून तिच्या नावावर या तिन्ही प्रतिष्ठित विक्रम नोंदवले गेले आहेत. विशेष म्हणजे हा विक्रम तिने वयाच्या अवघ्या ४ वर्षे ३ महिने ८ दिवस असताना साध्य केला.
रामरक्षा स्तोत्रापुरतेच तिचे ज्ञान मर्यादित नसून अच्युताष्टक, गणपती अथर्वशीर्ष, शिवतांडव स्तोत्र आणि मारुती स्तोत्र यांसारखी अनेक संस्कृत स्तोत्रे तिला तोंडपाठ आहेत. एवढ्या लहान वयात संस्कृत वाङ्मयाचा केलेला हा अभ्यास अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे.
श्रेयांकाच्या या विलक्षण कर्तृत्वाबद्दल तिला विविध मान्यवरांकडून गौरविण्यात आले आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिच्या कार्याचे कौतुक केले आहे.
तिला दादासाहेब फाळके यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्त आयोजित जागतिक महोत्सवात ‘परिवार काफ अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने नाशिक येथील पुष्परत्न सेवाभावी संस्थेकडून राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला.
रामरक्षा पठणाचे कार्यक्रम, विविध शाळांमधील बालमहोत्सवांमध्ये प्रमुख पाहुणी म्हणून सहभाग, महाराष्ट्र पोलीस अकादमीतील विशेष सादरीकरण, आकाशवाणी अस्मिता वाहिनीवरील मुलाखत तसेच रेडिओ विश्वासवरील संवाद यांमुळे तिच्या कार्याचा व्यापक प्रसार झाला आहे.
श्रेयांकाच्या या यशाची दखल अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके आणि वृत्तवाहिन्यांनी घेतली असून तिची कथा आज अनेक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संस्कृत ही केवळ पूजा-अर्चनेची भाषा न राहता ती समाजात अधिक व्यापकपणे पोहोचावी, या विचाराचे जणू ती जिवंत उदाहरण बनली आहे.
अवघ्या पाचव्या वर्षी संस्कृत स्तोत्रपठण, सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार आणि विश्वविक्रमांची मालिका आपल्या नावावर करणारी कु. श्रेयांका श्रेयस कुलकर्णी ही महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानाची बाब ठरत असून तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.














