
आशिष बिरिया, विशेष तालुका प्रतिनिधी, चंद्रपूर – “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशातून नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने चंद्रपूर शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर यांच्या वतीने रविवारी, दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता भाजप महानगर कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, थॅलेसेमिया तसेच विविध गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असते. अशा परिस्थितीत रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या सामाजिक उपक्रमात नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
“एका रक्तदानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला जीवनदान मिळू शकते,” हा मानवतेचा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार असून समाजातील प्रत्येक नागरिकाने रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












