
खेत बचाओ अभियान दरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि.12 : कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने खेत बचाओ अभियान राबवून जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वर्धा, बोरगाव, आमला आणि रत्नापूर येथे शेतक-यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानाअंतर्गत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जीवन कतोरे यांनी कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याच्या विविध तंत्रांविषयी माहिती दिली. खरीप हंगामातील पिकांच्या योग्य व्यवस्थापनाविषयी शेतक-यांना मार्गदर्शन करुन आपल्या शेतातील मातीची pH मुल्य चाचणी आणि पोषक तत्वांचे विश्लेषण करण्याचे महत्व सांगितले. या विश्लेषनामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची गरज समजण्यास मदत होईल आणि त्यानुनार योग्य खतांचा वापर करता येईल, असे सांगितले.
मातीचा सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी गांडूळ खत आणि ढेंचा सारख्या हिरवळीच्या खतांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला. याशिवाय पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिंबक पद्धतीचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. पावसाचे पाणी अडवून ते शेततळे नियोजनाद्वारे साठवणूक करण्याची गरज असल्याचे यावेळी जीवन कतोरे यांनी सांगितले. या अभियानादरम्यान पिडीकेव्ही अंबा सारख्या उच्च उत्पन्न देणाऱ्या सोयाबीन वाणांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन शाश्वत नफा मिळण्यास मदत होत असल्याची माहिती दिली गेली. रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून निंबोळी अर्क आणि मित्रकिटकांच्या सहाय्याने शुद्ध पीक घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात आमला येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी गाव विकासाच्या विविध बाबींवर भर दिला आणि शेतकऱ्यांना खरीप हंगामादरम्यान अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचा वापर करण्याचा सल्ला दिला. रत्नापूर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. भारती तिजारे कृषिविद्या विषयतज्ञ यांनी सोयाबीन पेरणी करतांना कोणती विशेष काळजी घ्यावी याविषयी ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले.
या उपक्रमाला रत्नापूरचे सरपंच सुधीर बोबडे, आमलाचे माजी सरपंच विठ्ठल इंगळे, ग्रामसेवक सुधीर भोसले, कृषिताई नीता होरे, वैभव चौधरी आणि प्रगतीशील शेतकरी उल्हास जैन यांनी सहकार्य केले, असे कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.












