Home एटापल्ली पेट्रोल पंपाच्या दीड ते दोन कोटी नफा रकमेवर पंचायत समिती प्रशासनाचा डल्ला?

पेट्रोल पंपाच्या दीड ते दोन कोटी नफा रकमेवर पंचायत समिती प्रशासनाचा डल्ला?

0
13

आमदार अभिजित वंजारी यांना नागरिकांनी दिले चौकशी करून दोषीवर कार्यवाहीचा मागणीचे निवेदन!

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : पंचायत समिती एटापल्लीद्वारे संचालित ‘विकास सर्व्हिस स्टेशन’ या पेट्रोल पंपाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत नागरिकांनी व संघटित व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अभिजित वंजारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. पेट्रोल व डिझेल विक्रीतून गेल्या अनेक वर्षांत मिळालेल्या अंदाजे दीड ते दोन कोटी रुपयांच्या नफा रकमेबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार मागास, अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित तालुका म्हणून सुमारे २२ वर्षांपूर्वी पंचायत समिती एटापल्लीच्या माध्यमातून भारत पेट्रोलियम कंपनीच्या सहकार्याने ‘विकास सर्व्हिस स्टेशन’ हा पेट्रोल पंप सुरू करण्यात आला. या पेट्रोल पंपातून दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल व डिझेल विक्रीच्या आर्थिक व्यवहारांचे नियमित व पारदर्शक रेकॉर्ड कार्यालयात उपलब्ध नसल्याने नफा रकमेच्या वापराबाबत संशय निर्माण झाला आहे. पेट्रोल पंप व्यवस्थापनाशी संबंधित काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

याशिवाय, पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आलेले एक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आपल्या मूळ शासकीय जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून बहुतांश वेळ पेट्रोल पंपाच्या कारभारात व्यस्त असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील शासकीय कामकाज प्रभावित होत असून विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी येणाऱ्या आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पेट्रोल पंपाच्या उत्पन्नातून करण्यात आलेल्या खर्च व विकासकामांची स्वतंत्र लेखापरीक्षणाद्वारे तपासणी करण्यात यावी, तसेच संपूर्ण आर्थिक व्यवहारांची चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटित व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक मनोहर बोरकर, नगरसेवक निजान पेंदाम, निलेश गंपावार, नरोत्तम अधिकारी, अरुण डे, श्रीनिवास कम्बोगौनीवार, दिलीप पुपरेड्डीवार, शुभम वन्नमवार, पंकज पत्तीवार, शिवचरण टोप्पो, अमित कत्तीवार, रमेश ओडपल्लीवार, तिरुपती येलकुचीवार, दिशांत भांडेकर, झंटू सरकार, अनिकेत हिचामी, अमित सिकदर, निसार शेख यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन आमदार अभिजित वंजारी यांना सादर करण्यात आले.

दरम्यान, या निवेदनाची दखल घेत संबंधित प्रकरण शासन स्तरावर मांडून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार वंजारी यांनी नागरिकांना दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here