
जालना प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – जालना-राजूर मार्गावरील गुंडेवारी परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिन्ही मुली गंभीर जखमी झाल्या. त्यापैकी वैष्णवी जगन्नाथ खांडेभराड हिचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेल्या अन्य दोघींना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त तिघीही राजूरकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. परिसरातील नागरिकांनी भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.












