संकेत प.बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
समता सैनिक दलाच्या सर्व समर्थक, हितचिंतक व दलात सक्रिय असलेल्या सर्व पदाधिकारी – सैनिकांना तसेच देशातील तमाम आंबेडकरी जनतेला आम्ही आनंदाने जाहीर करू इच्छितो की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या तीन ही संघटना व संस्था पुनर्जीवित करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी आपण सर्व बांधील आहोत.ही आपली जबाबदारीच नव्हे तर कर्तव्य देखील आहे.
अशी भूमिका घेवून समता सैनिक दलाच्या माध्यमातून खरी आंबेडकरी चळवळ उभारण्याचा प्रयत्न अनेक प्रामाणिक लोक करीत आहेत. आम्ही देखील त्यातील एक घटक आहोत. परंतु त्यात एक मोठा अडथळा आहे. की आम्ही दलाचे कार्य करणारे लोक वेगवेगळ्या गटात कार्यरत आहोत. त्यामुळे समता सैनिक दलाचे अनेक गट असून त्यातही फाटाफूट आहे असे दुर्दैवी चित्र समाजासमोर, देशासमोर निर्माण झाले आहे. आणि ते सत्य आहे.
आंबेडकरी चळवळीत ऐक्य व्हावे. आंबेडकरी विचारांची एकसंघ ताकत निर्माण व्हावी हा विचार सर्वांच्या मनात येत असतो. मात्र त्यावर कृती कार्यक्रम राबविण्याचे राहून जाते.कधी नकळत तर कधी जाणून बुजून या फाटाफूट कायम रहाव्या, गट तट कायम राहावे असा ही प्रयत्न केला जातो. हे सत्य नाकारता येणार नाही.
या निराशाजनक आणि उदासीन परिस्थितीत आशेचा एक किरण निर्माण व्हावा असा प्रयत्न दिनांक 4 जुन 2023 रोजी करण्यात आला होता.या दिवशी महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या समता सैनिक दलाच्या दोन गटाच्या प्रमुख लोकांची बैठक झाली. चर्चा झाली. एकवाक्यता निर्माण झाली.आणि दोन्हीकडील लोकांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला.
या नंतर देखील समता सैनिक दलाचे जितके गट आहेत त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न आम्ही चालूच ठेवला आहे. देशात आणि राज्यात कार्यरतअनेक गट प्रमुखांशी चर्चा केली .जे तयार झाले त्यांना निमंत्रण पाठवले आणि 9 जुलै 23 रोजी चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे केंद्रीय कार्यालयात कार्यरत असलेल्या स.सै. दलाच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
त्यात सकारात्मक प्रतिसाद मिळाला.आणि पुढील काळात एकत्रितपणे काम करण्याचे मान्य करण्यात आले.
या बैठकीसाठी नागपूर, यवतमाळ, वर्धा, मुंबई येथून प्रमुख प्रतिनिधी उपस्थित झाले.सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत सखोल चर्चा करण्यात आली.चर्चेत आलेल्या सर्व मुद्द्यांवर एकमत झाले.काही मुद्दे बाजूला ठेवण्यात आले.आणि दोन्ही गटांनी प्राथमिक स्वरूपात दलाची घटना , तत्व , ध्येय , शिस्त या बाबींवर भर देवून एकत्रितपणे काम करण्याच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली.
या प्रथम बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा संपन्न झाली.
या बैठकीची व्यवस्था चाळीसगाव तालुका प्रचारक आयु.नितीन मरसाळे,आयु. बाबा पगारे व कार्यालय सचिव आयु.घनशाम बागुल यांनी अतिशय चोख केली होती.
पुढील बैठक माहे सप्टेंबर 23 मध्ये नागपुर येथे आयोजित केली जाईल असे ही ठरविण्यात आले आहे. तसेच सर्व गटांना या प्रक्रियेत सामील करण्याचे प्रयत्न देखील सातत्याने चालू राहतील असे ही एकमताने मान्य करण्यात आले आहे.
या चर्चेत खालील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आयु.धर्मभुषण बागुल चाळीसगाव आयु. राजाभाऊ कदम मुंबई आयु. धम्मा कांबळे यवतमाळ ॲड. अभय लोखंडे नागपूर आयु. अलोक रामटेके वर्धा, आयु.संजय ओरके वर्धा, आयु. सुनील रामटेके वर्धा, आयु.शशिकांत थुल वर्धा उपस्थित होते.

