धम्म मेळाव्यात भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो यवतमाळ यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर-शिवणी मार्गावरील धम्मभूमी उमा नदीघाटावर रत्नापूर, नाचनभट्टी व शिवणी येथील बौद्ध बांधवांनी तयार केलेल्या धम्मभूमी या प्रेक्षणीय स्थळी गेल्या सात ते आठ वर्षांपासून धम्मभूमी विकास सेवा समितीच्या वतीने बौद्ध धम्म मेळावा आयोजित केला जात आहे. या वर्षीसुद्धा २५ डिसेंबर२०२३ ला बौद्ध धम्म मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या धम्म मेळाव्यात भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो यवतमाळ यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण ११ वाजता होईल. त्यानंतर समता सैनिक दल शाखा नवेगांव, पळसगाव हे मानवंदना देतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे राहणार असून, प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, ललीत खोब्रागडे अध्यक्ष बोधी फाउंडेशन नागपुर, प्रा. गौतम डांगे आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.सायंकाळी ४ वाजता उपस्थित लोकांना भोजनदान आणि सायकाळी ६ वाजता बुद्ध भीम गीतावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत एकल व समूह नृत्य स्पर्धा होणार आहे. तरी सर्व जनतेने या भव्य बौद्ध धम्म मेळाव्यात होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन धम्मभूमी विकास सेवा समितीचे अध्यक्ष सदाशीव मेश्राम, उपाध्यक्ष नामदेव खोब्रागडे, सचिव धनोज खोब्रागडे यांच्यासह सदस्यांनी केले आहे.

