मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी गावनिहाय सुक्ष्म नियोजन करा – विजयलक्ष्मी बिदरी

0
77

सर्वेक्षणासाठी प्रगणकांची नेमणूक व प्रशिक्षणाचे नियोजन करण्याच्या सूचना

उषा नाईक
विदर्भ संपादक
प्रबोधिनी न्युज

नागपूर – मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाकरिता सर्व जिल्ह्यांनी सर्वेक्षण करावयाची कुटुंबे, सर्वेक्षणासाठी प्रगणकांची नेमणूक व त्यांचे प्रशिक्षण, आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविणे आदिंबाबत गावनिहाय सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी‍ बिदरी यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाच्यावतीने राज्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याबाबत करावयाची कार्यवाही व तयारीविषयी श्रीमती बिदरी यांनी विभागातील सहा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांची दुरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी आयुक्त कार्यालयात नागपूर मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार,अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील आणि विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त उपस्थित होते.
या सर्वेक्षणाकरिता पुणे येथील गोखले इंन्स्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक्स आणि मुंबई येथील आयआयपीएस संस्थेद्वारे स्वॉफ्टवेयर अप्लीकेशन तयार करण्यात येत आहे. याद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षणासाठी गावनिहाय नियोजन करण्यात यावे. या कामी ग्रामसेक, तलाठी, कोतवाल, कृषी सेवक, पोलीस पाटील, शिक्षक आदींची प्रगणक म्हणून नेमणूक करण्यात यावी आणि तशी माहिती आयोगाला तातडीने देण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी दिले. १०० कुटुंबासाठी एक प्रगणक आणि या प्रगणकांवर निरिक्षणासाठी एक निरिक्षक याप्रमाणे नियोजन करावे.प्रगणकांना प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.
या सर्वेक्षणादरम्यान प्रगणकांद्वारे मोबाईलवर स्वॉफ्टवेयर अप्लीकेशनमध्ये माहिती भरण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १५० प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. प्रगणकांना आयोगातर्फे युजर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे, या कामासाठी मानधनही देण्यात येणार आहे. स्थानिक शासकीय यंत्रणा व जिल्हा परिषदेमार्फत प्रगणक व निरिक्षक पुरविण्यासंदर्भात यावेळी निर्देश देण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची काळजी घेऊन पोलीस प्रशासनाने आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविण्याच्यादृष्टिने नियोजन करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या.
जिल्ह्यांसह विभागात नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांमध्येही हे सर्वेक्षण होणार आहे. याबाबत करावयाची कार्यवाही व तयारी याविषयीही श्रीमती बिदरी यांनी आढावा घेतला.
समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक : मागासर्वीय आयोगास जिल्ह्यांकडून सर्वेक्षणातील माहिती संकलीत करुन देण्याच्या अनुषंगाने श्रीमती बिदरी या विभागीय समन्यवयक अधिकारी असतील. श्रीमती बिदरी यांनी विभागीय आयुक्तालयातील उपायुक्तांची जिल्हा निहाय समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. यानुसार सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांची सहाय्य‍क विभागीय समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासोबतच नागपूर जिल्ह्यासाठी करमणूक कर उपायुक्त चंद्रभान पराते, भंडारा जिल्ह्यासाठी विकास आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, गोंदिया जिल्ह्यासाठी पुरवठा उपायुक्त अनिल बन्सोड, चंद्रपूर जिल्ह्यासाठी नियोजन उपायुक्त धनंजय सुटे तर गडचिरोली जिल्ह्याकरिता विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांची समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. वर्धा जिल्ह्यासाठी प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे यांची समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here