आश्रम शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम

0
45

चंद्रपूर, दि. 23 मे : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत कार्यरत असलेल्या 8 शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 2024 पासून प्रकल्पात कार्यरत झाल्यानंतर त्यांनी विविध शैक्षणिक व गुणवत्ता वृद्धी उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत.
प्रकल्प अधिकाऱ्यांनी ‘मिशन शिखर’, समर कॅम्प, शैक्षणिक सहल, भारत दर्शन, परदेशी शिष्यवृत्ती, भविष्यवेधी शिक्षक प्रशिक्षण, तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासपूरक प्रशिक्षणांचे आयोजन करून शाळांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.
2025 पासून शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दर आठवड्याला मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक व इतर कर्मचाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेऊन भरती आढावा घेतला जात आहे. स्वतः प्रकल्प अधिकारी शाळांना भेट देत असून, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच गावातील सरपंच यांच्यासमवेत संवाद साधून पालकांपर्यंत शाळेतील सुविधा व उपक्रम पोहोचवण्याचे आवाहन करत आहेत.
20 मे 2025 रोजी त्यांनी शासकीय आश्रम शाळा मंगी तर 21 मे रोजी मरेगाव येथील शाळेला भेट देऊन भरतीचा आढावा घेतला. येत्या आठवड्यात उर्वरित सर्व शाळांना भेट देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
विद्यार्थी भरती मोहिमेत त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन इतर कर्मचाऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमशील कार्याची प्रकल्पात सर्वत्र प्रशंसा होत आहे.
प्रकल्प अधिकाऱ्यांचे मनोगत :
शासकीय आश्रम शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण जेवण, उत्कृष्ट शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. आम्ही विविध उपक्रम – उन्हाळी शिबीर, विज्ञान प्रदर्शने, मिशन शिखर अंतर्गत JEE/NEET/CET वर्ग, मेमरी इनहान्समेंट, बॉयटर माइंड, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन – या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवत आहोत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचा शासकीय आश्रम शाळांमध्ये प्रवेश निश्चित करावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here