“विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा” राबवण्यात येणार
शारदा भुयार
महिला जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज, वाशीम
वाशिम- आज दि.६ जून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात ६ ते २१ जून पर्यंत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवला जाणार आहे.
आशा स्वयंसेविकांनी नेहमीप्रमाणे आपल्या कामाची चुणूक दाखवून लोकांना अतिसार व त्यावरील घरगुती उपचारांची माहिती द्यावी. तसेच अतिसार असलेल्या बालकांच्या पालकांना ओआएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक व १४ दिवस झिंक गोळ्या त्या-त्या वयोगटानुसार बालकांना देण्याबाबतची माहिती द्यावी.
ही विशेष मोहिम प्रभावीपणे राबवण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आजच्या सभेत दिल्या.
आज ६ जून पासून अतिसार असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचेवर प्लॅन ए नुसार घरगुती स्तरावर उपचार करण्यात येणार आहे. ज्या बालकांना प्लॅन ए नुसार औषधोपचार करूनही फरक पडत नाही त्यांना उपकेंद्रस्तरावर प्लॅन बी किंवा प्रा.आ.केंद्रावर प्लॅन सी नुसार औषधोपचार करण्यात येणार आहे.
पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पालकांना तसेच काळजी घेणाऱ्यांना योग्य समुपदेशन करावे, अतिजोखमीचे क्षेत्र आणि दुर्बल घटकांवर विशेष लक्ष देणेच्या सुचना आरोग्य कर्मचारी यांना दिल्या. तसेच माहिमेची व्यापक जनजागृती करावी असे त्यांनी सांगितले.
अतिसारामुळे होणारे बालमृत्यु शून्यावर पोहोचविणे हे या मोहिमेचे अंतिम ध्येय आहे. उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये पूर/ नैसर्गिक आपत्ती दरम्यान अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारची पूर्वतयारी आहे. अतिसार असलेल्या ० ते ५ वयोगटातील सर्व मुलांना ओआरएस आणि झिंकचे वाटप होईल व त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची दक्षता घेतली जाणार आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अतिसार झालेल्या बालकांच्या घरामध्ये ओआरएस व झिंकचा वापर तसेच उपलब्धता वाढवणे,अतिसारासह जलशुष्कता असलेल्या बाल रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे,शहरी झोपडपट्टया, पूरग्रस्त भाग, आरोग्य सेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, वीटभट्टी कामगार, स्थलांतरीत मजूर आणि बेघर मुले इत्यादी यांसारख्या जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे,मागील २ वर्षात अतिसाराची साथ असलेले क्षेत्र व पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असलेले क्षेत्र यावर विशेष लक्ष देणे. हे धोरण आरोग्य विभागाने निश्चित केले आहे.
या मोहिमेच्या नियोजनाकरिता जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली.
या आढावा बैठकीस अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख ,जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विजय काळे उपस्थित होते. या मोहिमेची प्रचार व प्रसिद्धी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी पी.एस.ठोंबरे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात येणार आहे.

