शारदा भुयार
जिल्हा प्रतिनिधी
वाशीम
वाशिम : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील आणि पारंपारिक लोककलेच्या लोककलावंत क्षेत्रातील,केवळ वयोवृद्ध लोककलावंताना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून दरमहा पाच हजार रुपये मानधन दिल्या जाते. या योजनेकरीता लाभार्थ्याना स्थानिक पंचायत समिती मार्फत, जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे वयोवृद्ध मानधनाकरीता प्रस्ताव पाठवावे लागतात.व त्यावर “जिल्हा वृद्ध कलाकार मानधन लाभार्थी निवड समिती” मंजूरी देत असते.जिल्हा निवड समितीने मंजूरी दिलेल्या वयोवृद्ध लोककलावंताना सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई मार्फत लाभार्थ्याचे बँक खात्यात डीबीटी द्वारे मानधनाचे पैसे दरमहा पाठवले जातात.तसेच या योजनेचा लाभ घेण्याकरीता, “फक्त आणि फक्त कलेच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या लोककलावंताना मागील पंधरा ते वीस वर्षाचे कलेच्या कार्यक्रमाचे साक्षीपुरावे म्हणून कलेच्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ ; वृत्तपत्रातील प्रसिद्ध बातम्याचे कात्रण ; कलेबद्दल मिळालेले पुरस्कार,सन्मानपत्र, गौरवपत्र,प्रमाणपत्र ; कलेशिवाय इतर उत्पन्नाचा स्त्रोत नसल्याचे व इतर कोणते निवृत्ती वेतन नसल्याचे भारत सरकारच्या नोटरी कडून प्रमाणित केलेला प्रतिज्ञालेख, व चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो. थोडक्यात म्हणजे “वृद्ध कलाकार मानधन योजना तळागाळातील – गोरगरीब गरजू निराधार कलावंता करीता आहे.” तसेच सद्यस्थितीत शासनाने “एक व्यक्ती एक वेतन” हे धोरण लागू केलेले आहे. त्यामुळे ह्या योजनेतील सहभागी व्यक्तींना केन्द्रशासनाच्या सांस्कृतिक विभागाचे मानधन मिळेलच असे नाही.परंतु काही व्यक्ती “ग्रामिण क्षेत्रातील लोककलावंताची दिशाभूल करून,तुम्हाला केन्द्रशासनाचे मानधन मिळवून देतो.” अशा भूलथापा देऊन कलावंतांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यामुळे विदर्भ लोककलावंत संघटनेकडून अध्यक्ष संजय कडोळे यांनी ग्रामिण भागातील लोककलावंताना आवाहन केले आहे की, “ग्रामिण लोककलावंतानी केन्द्रशासनाच्या मानधन मिळविण्याच्या नादाला लागू नये.केन्द्रशासनाचे मानधन हे देशपातळीवर कार्य करणाऱ्या केवळ दिग्गज लोककलाकरीता आहे.आणि ते मानधन मिळविण्यासाठी कलावंताकडे देशपातळीवरील अखिल भारतिय स्तरावरील लोककलेच्या किंवा रंगभूमीच्या कार्यक्रमाचे विस ते पंचवीस वर्षाचे साक्षीपुरावे असणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे लोककलावंतानी फक्त राज्यशासनाच्या मानधना करीता प्रयत्न करावे.मात्र चुकीच्या भूलथापांना बळी पडून केन्द्रशासनाच्या मानधनाची अपेक्षा करू नये.असे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.

