लेख – नातं समजूतदारीचं..!

0
1635

प्रेम म्हणजे काय याविषयी प्रत्येकांचे विचार हे वेगवेगळे असतात. मात्र प्रेम हे प्रेमच असते. फक्त ऐकमेकांप्रति अपेक्षा भिन्न असतात. कोणी प्रेम चेहरा बघून करतो, कोणी पैसा, कोणी नोकरी बघून आवडलेला जोडीदार किंवा पहिलं प्रेम या नावाचं बॅनर लावतो. तर कोणी भविष्याचा विचार करून योग्य जोडीदाराचा शोध घेत रहातो. तसेच अगदी कमी वयात झालेल्या प्रेम हे कधीही प्रेम नसते. ते फक्त वयात होणारा बदल एक आकर्षण असते. जस जसे वय वाढत जाते तशा पद्धतीने प्रेमाचा विस्तार वाढत जातो. याचा अर्थ असा होत नाही की प्रेम कोणाला आवडत नसेल म्हणून. प्रेम ही भावना आहे. आणि ही प्रत्येकाच्या हृदयात सामावलेली असते. फक्त कोणी त्याविषयी बोलतो. तर कोणी बोलत नाही. शाळा, कॉलेज यामधून शिक्षण पूर्ण करत असताना हळूहळू आई-वडील भाऊ बहिण यांच्यावर असणार जीवापाड प्रेम थोड अनोळखी व्यक्ती साठीही वाढत जाते. त्यालाही आपण आपल्या मनात सामावून घेतो. त्याला घेऊन बरीच भविष्याबद्दल स्वप्नही बघतो. पण हे करत असताना थोडी जीवाची घालमेल होते. कारण आपण स्वतःचे प्रेम मिळवण्यास असमर्थ असतो. प्रेम म्हणजे केवळ आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करून घेणे हा कधीही नसतो. खरं प्रेम हे आदर पूर्ण असं संस्कारांना जपणारं असते. घरातील मोठ्या व्यक्तींच्या सहमतीने योग्य निर्णय घेऊन ते शेवटास नेणार असते. तसेच प्रेमाचा घट्ट रेशमी बंध नात्यात बांधणार असते. बऱ्याच घरात प्रेमाच्या विरोध केला जातो. जात,धर्म या विषयांना घेऊन, मात्र आता बऱ्याच घरात या गोष्टी बघितल्या जात नाही. आताच्या नवीन पिढीनुसार सुशिक्षित मुला-मुलींना स्वतःच्या जोडीदार निवडण्याचा हक्क आहे. आपण फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतो. जोडीदार कसा असावा हे आपण त्यांना सांगू शकतो. लग्न केले म्हणजेच झाले, असं होत नाही. लग्न झाल्यावर पोटापाण्याचा प्रश्न असतो. त्याकरिता पैसा खूप महत्त्वाचा आहे. याची जाणीव मुलांना करून दिली पाहिजे. प्रेमाने पोट भरत नाही. एक वेळ अशी येते की घेतलेले निर्णय हे चुकीचे वाटतात. याविषयी जाणीव करून मुलांना शिक्षणावर अगोदर लक्ष देण्यास आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सांगावे लागेल. स्वतःच्या घराचा व आपल्या जोडीदाराच्या गरजा पूर्ण करण्याच सामर्थ्य आपल्यात असावे. तसेच जोडीदार हा प्रेम करणारा असावा. प्रेमाचा दिखावा करणारा नकोच. आपल्या कष्टाची कदर त्याला यायला हवी. आपल्या आई-वडिलांविषयी आदराची भावना असावी. नाहीतर बरेच जोडीदार हें एकमेकांच्या आई-वडिलांना, घरातील लोकांना खूप वाईट सतत टाकून बोलतात. यात मात्र कसतरी नातं टिकवणे हे संसारासाठी महत्त्वाचे असते. यात कुठेही एकमेकांप्रती आदर राहत नाही. बऱ्याच ठिकाणी पैशावरुनही बराच वाद होत असतो. की पैसे खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे म्हणून. पण जर घरात एकच पगार येत असेल तर बऱ्याच प्रमाणात काटकसर करावी लागते. पैसे हवे त्याचं ठिकाणी खर्च करावे लागतात. आणि उरलेले पैसे अडीअडचणीसाठी राखून ठेवावे लागतात. यात मात्र खूप मोठ्या प्रमाणात इच्छा मारल्या जातात. काही घ्यायची इच्छा झाली तरीही हवे ते घेता येत नाही. यामुळे जोडीदाराबरोबर वाद होतो. पण आताच्या गृहिणी या स्मार्ट गृहिणी बनून घरात राहून आपल्याला जे आवडते ते कार्य करू शकतात. जसे की शिवणकाम, ब्युटी पार्लर सुरू करून, मेहंदी क्लास घेऊन बऱ्याच गोष्टी घरात बसून पैसे कमवू शकतात. मात्र यात त्या गृहिणींना आवड असावी. केवळ जोडीदारावर अवलंबून राहता कामा नये. जोडीदाराला दोष देत पैसा पुरत नाही, गरजा पूर्ण होत नाही, असं म्हणत जोडीदाराला दोष देऊ नये. पण बऱ्याच घरात दोन पगार येत असूनही तरीही वाद होतो. यात, वर्चस्व हे येते. दोघेही आपापल्या पगाराची, पदाची तुलना करत असतात. आणि हेच तुलना वादास कारणीभूत असते. म्हणून या असल्यावादापासून जर स्वतःला दूर ठेवायचे असेल तर थोडा स्वतःत बदल करावा लागतो. एक तर खूप कमी बोलावे किंवा बोलूच नये. त्यांना जसं पटते तसं करू द्यावे. कारण प्रत्येकाला स्वतःच्या मनाने जगण्याचा हक्क आहे. आपण फक्त आपल्या आई-वडिलांवर हक्काने बोलू शकतो. आपल्या इच्छा आई वडिलांना सांगू शकतो. जे हवे ते मागू शकतो. पण जोडीदाराशी बोलतांना थोडं प्रेमाने आणि आदराने बोलावं, एकमेकांचा आदर करावा, न कसला वाद घालून..! आपुलकीने सोबत राहावे. वाद झाल्यावर समजून सांगणारे खूप कमी असतात तर भांडण बघणारे जास्त असतात, सोबत भांडण अजून वाढवणारे ही. बऱ्याचदा होणाऱ्या वादामुळे वाट्याला एकांत येऊ शकतो. आपले आयुष्य आपल्या पद्धतीने मस्त जगावं. लग्न झालं म्हणून बऱ्याच आवडणाऱ्या गोष्टी सोडून देणे हें योग्य नाही. ज्या आवडतात त्या मनापासून करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या जोडीदाराला आपल्या इच्छा,जे करायचे आहे त्याविषयी सांगावे. कारण आपण जोडीदारांशी जेव्हा मन मोकळ्यापणाने बोलतो तेव्हा आपल्याला पूर्ण सहकार्य जोडीदाराचे मिळत असते. कारण तुम्ही जोडीदाराचा आदर, प्रेम करता.म्हणून तुम्ही स्वतःसाठी पाहिजे तितके पैसे खर्च केले तरीही तुम्हचा जोडीदार काहीही म्हणणार नाही. कारण जोडीदाराला ही माहिती असते की माझ्या जोडीदार हा महत्त्वाच्या गोष्टीसाठीच पैसे खर्च करणार म्हणून, गरजा पूर्ण करणारा मीच आहे. आणि जोडीदाराच्या गरजा पूर्ण करणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. प्रेम नातं फुलवते पण अट हीच असते की एकमेकांप्रती फक्त मनापासून आदर आणि विश्वास असावा. आजच्या स्टेटसच्या जगात बरीच जोडपे हें खूप आवडीने आपल्या जोडीदाराला घेऊन फोटो ठेवतात. व्हाट्सअप स्टेटस ठेवतात. माझ्या जोडीदार खूप सुंदर आहे. पण समजस आहे..? हें मात्र दिसत नाहीं. स्टेटस बरेच लोक एकमेकांचे बघत असतात. पण बरेच जोडपे असे असतात की ते मात्र जोडीदाराबरोबर स्टेटस कधी ठेवत नाही. पण त्यांना भेटल्यानंतर लक्षात येते की कितीतरी प्रेम यांच्या नात्यात आहे. एकमेकांचा किती आदर हे करतात. अशा नात्यात खूप जास्त बोलण्याची गरजच पडत नाही, हें दिसून येते. हें यावरून कारण, नेहमी एकमेकांना वेळ देत असल्यामुळे एकमेकांच्या सवयी, आवड, बोलण्याची पद्धत, नजरेची भाषा यावरून सहज सर्व कळते. म्हणूनच तर म्हणतात की समजूतदारीच नातं जास्त टिकते. जिथे एकमेकांना भरपूर वेळ दिला जात असेल, एकमेकांच्या कलागुणांचा आदर केला जात असेल, तर ते नातं फुलते, बहरते, आनंदाने ऐकमेकांचा आदर, विश्वास याला ठेचं नं लावता सोबत रहाते. आणि खरं तर हें आहे कीं असं सहज म्हणत नाही की…

तू माझ्यासाठी सर्व काही आहे
तू आहे म्हणूनच मी आहे
तुझं असणं माझ्यासाठी खूप काही
तू नसताना कशालाही किंमत नाही
तुझी साथ शेवटच्या श्वासापर्यंत असावी
तुझी साथ प्रत्येक जन्मो- जन्मी मिळावी

लेखिका – सौ.चैताली संगोपाल वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here