आज वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा
प्रा. राजकुमार मुसणे
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – नाट्य, नृत्य, अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी बहुआयामी कलावंत म्हणजेच पौर्णिमा तायडे होय.सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही स्वबळावर , स्वसामर्थ्याने अभिनयाच्या आवडीमुळे नाट्य क्षेत्रात पदार्पण करून आपल्या अस्तित्वाची नोंद प्रकर्षाने करणाऱ्या धडपड्या वृत्तीच्या या होतकरू, परिश्रमी अभिनेत्रीची कारकीर्द संघर्षमय आहे. बालवयातील शाळेपासूनच विविध स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने व सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य – नाट्यात हिरीरीने सहभाग नोंदवत अभिनयाची चुणूक दाखवीत वलय निर्माण केले. नाट्यक्षेत्राशी निगडित कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही कोणतेही अभिनयाचे प्रशिक्षण न घेता अनुभव, अनुकरण आणि शिकण्याच्या धडपडीतूनच यशस्वी वाटचाल होत गेली.पुढे उच्च शिक्षण घेत असतानाच सन २००३ मध्ये हेमंत मानकर लिखित,संजय काशीकर दिग्दर्शित ‘चिंधी बाजार ‘या नाटकातील मंगला हे पात्र जिवंत साकारल्याने पौर्णिमाचे नाट्य क्षेत्रातील पदार्पण लक्षणीय ठरले. तेव्हापासूनचे रंगमंचावर ठेवलेले पाऊल राज्य नाट्य स्पर्धा, विविध एकांकिका स्पर्धा, व्यावसायिक नाटक ते झाडीपट्टी रंगभूमीवरील विविध भूमिका या पौर्णिमा तायडे यांच्या चतुरस्त्र विविधांगी अभिनयाने आजतागायत रंगमंचावरील सदोदित वावर वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.
नाट्यक्षेत्राची आंतरिक ओढ, आवड व झालेल्या लौकिकामुळे दिवसेंदिवस एकापेक्षा एक नाटकातून भूमिका साकारत प्रवास सुरू ठेवला. पथनाट्य, एकांकिका, जलस्वराज्यचा व हागणदारीमुक्त प्रकल्प, विविध जनजागृती पर कार्यक्रमाप्रमाणेच नाटक ते महानाट्य असा अभिनयाचा चढता आलेख उंचावत आहे. अभिषेक बेलारवर लिखित ‘कळत न कळत’ (सुमन), विरेंद्र गणवीर लिखित राईट्स (वीरा), दिल्ली येथे बहुजन रंगभूमी नागपूर प्रस्तुत ‘चले हम प्रबुद्ध भारत की ओर’, या महानाट्यातील अभिनयाने विलक्षणअभिनयाची छाप निर्माण केली.
बहुजन रंगभूमी,दीपरंग नाट्य महोत्सव, सकाळ करंडक आंतर महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा,दोन अंकी हौशी राज्य नाट्य स्पर्धा,कामगार कल्याण स्पर्धेच्या नाटकातील प्रभावी अभिनयाने अमिटअसा ठसा उमटविला.
देखणे आकर्षक व्यक्तिमत्व, बोलके डोळे, लवचिक शरीरयष्टी,नृत्यकलेत निपुण, सौंदर्य,दिलखेचक अदाकारी व विलक्षण जादुई आवाजाने रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून अग्रस्थानी राहिली.धडपडा समन्वयवादी स्वभाव, हसून संभाषण करण्याचे कौशल्य, ध्येयवादी,जिद्दी,नाविन्याचा ध्यास,नैसर्गिक अभिनय, भूमिकेशी समरसून अभिनय करण्याची झपाटलेपणाचीवृत्ती व समर्पण या विशेषामुळे यांचा रंगमंचीय प्रवास बहरतच गेला. परिणामी अभिनयक्षेत्रात अनेकानेक संधीही मिळत गेल्या.एन.चंद्रशेखर , दिलीप मुखरिया दिग्दर्शित’ माँ तुम जो बसी हो पाहडोमे ‘ २००७ अलबम मधील प्रमुख अभिनेत्रीची भूमिका तथा ‘तुझ्यात मी’, मराठी चित्रपटातील भाजीवालीची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण ठरली. नाटक चित्रपटाप्रमाणेच फूटपाथ, शॉर्टफिल्म,’आव बाई सासूबाई’, ‘दोघात तिसरा बायकोला विसरा,”नागपुरी खर्रा’. यूट्यूब वर एपिसोड’ अशा वेगवेगळ्या क्षेत्रातही पौर्णिमा तायडे यांनी उत्तुंग भरारी घेत यशस्विता सिद्ध केली.
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील झाडीपट्टी रंगभूमी ही रसिक निष्ठा व नाट्यवेडामुळे प्रसिद्ध आहे. मुंबई पुण्याकडील प्रस्थापित अनेक रंगकमींना आकर्षित करणारी आहे. मूळ नागपूरच्या पौर्णिमा तायडे यांनीही झाडीपट्टी रंगभूमीवर २००७ मध्ये पदार्पण करून विविध हौशी व व्यावसायिक नाट्य मंडळाच्या अनेक नाटकातून विविध प्रकारच्या भूमिका वटविल्या. महाराष्ट्र नाट्य रंगभूमी वडसा,चंद्रकमल थिएटर्स वडसा या प्रेसमध्ये साधारणत: बाराशे नाट्य प्रयोगात भूमिका केल्या.निर्माता प्रा.डॉ.शेखर डोंगरे व मार्गदर्शक के.आत्माराम यांच्या चंद्रकमल थिएटर या झाडीपट्टीतील आघाडीच्या नामवंत नाट्य मंडळात कलावंत म्हणून त्या अभिनय करतात. पापी पुत्र, पंख तुटलेले पाखरू, टाकलेले पोर, बायको पेक्षा मेहुणी बरी, बायको डोक्यावर चढली अशा नाटकाद्वारे विविध भूमिका साकारतात.
रमेश बोरकर लिखित ‘बायको चढली डोक्यावर’ हे नाटकच मुळात आरती या मुख्य पात्राशी निगडित आहे. नाटकाच्या सुरुवातीलाच नवविवाहित आदित्य – आरती दांपत्याचा स्वागतासाठी उंबरठ्यावर आरती ओवाळली जाते. त्यावेळेसचा त्रागा व फणकारा करणारी पोर्णिमा तायडे यांचा कायिक, वाचिक व आहार्य अशा चतुरस्त्र अभिनयाबरोबरच उत्तम संवादफेक, संपूर्ण रंगमंचाचा स्वाभाविक वापर,मुद्राभिनय प्रेक्षकांना घायाळ करतो. आरतीचे खलपात्र हुबेहूब अन चपखलपणे पौर्णिमां तायडे हिने विविध छटांसह उत्तम साकारताना प्रेक्षकही अचंबित होतात.ती शहरी गुलछडी , फटकडी, लावण्यवती, जादुई, कजाग, भांडखोर , फटकळ आरतीची भूमिका विलक्षण तन्मयतेने अप्रतिम वटवते. आरतीचा मनमानीपणा, राग, संताप, त्वेष,नखरेलपणा,नवऱ्यावरील वचक, तापटपणा, गोंधळ, तडफड, जिद्दी, हट्टीपणा, हेकेखोरपणा व अहंकारीवृत्ती असे विविध भावाविष्कार अभिनयसम्राज्ञी पौर्णिमाने अभिनयाच्या जोरावर साकारत नाटकाला उंचीवर नेले. तिची बहारदार भूमिका अवाक होत प्रेक्षक पाहतच राहतात. प्रसंगी खल प्रवृत्तीला शिव्याही देतात. हे तिचे खरे यश आहे असे म्हणावे लागेल.यश निकोडे लिखित ‘बायको पेक्षा मेहुणी बरी’ नाटकातील रागिणी , प्रेमाचे चाळे करणारी, भावजीला आपल्या प्रेम फासात अडकवत विवाह बंधनात अडकणारी, मनमौजी, स्वच्छंदी, नखरेल,सौंदर्यवती रागिणीची भूमिका पौर्णिमा उत्तम वटविते.धनंजय ढवळे लिखित पापी पुत्र, नाटकात भावाच्या शिक्षणासाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षांना बाजूला सारत धडपडणारी लक्ष्मी, ‘भलताच घडल वेडाच्या भरात’, नाटकात पल्लवी अदा ,मुजरा व नृत्य तसेच पागल व्यक्तीला सांभाळण्याचा , भलतच घडल्यावर समर्थपणे तोंड देण्याचा व आपली व्यथा स्पष्ट मांडण्याचा तथा ठोसास ठोस उत्तर देणाऱ्या राणीचे जिकिरीचे पात्र बोलके डोळे व चेहऱ्यावरील हावभावाने पौर्णिमा तायडे हिने जबरदस्त साकारले. संजय ठवरे लिखित ”का रक्त पिता गरीबांचे’ नाटकातील अस्मिता किरण सूर्यकांतच्या प्रेमाला बळी ठरत सर्वस्व गमावलेल्या अस्मिताचा आक्रोश व बंडकारी उलगुलानी रणरागिणित्व पौर्णिमा तायडे यांनी अभिनयाने सिद्ध करीत प्रेक्षकांची वाहवा मिळवते.’ टाकलेले पोर ‘ नाटकातील ड्रायव्हरची मुलगी असूनही करोडपतीची मुलगी दर्शविणारी आणि करोडपत्याला आपल्या गळात अडकवण्यासाठी धडपडणारी बंडलबाज मेघाची विनोदी भूमिकाही विलक्षण अभिनयाने पौर्णिमा तायडे साकारते.विनयचे भंगार वास्तव माहीत होताच आक्रमक होते आणि आपणही गरीब असल्याचे सांगताना तिच्यातील धोकेबाजपणा उघडकीस येताच तिच्या नौटंकीस प्रेक्षकही दाद देतात. तद्वतच’ कसोटी कुंकवाची ‘नाटकातील विशाखा पाटलीन पिसाळलेला नाटकातील वैशाली, भूक नाटकातील सपना अशा अनेक नाटकातील पौर्णिमेच्या विविध भूमिका रसिकप्रियतेमुळे अजरामर ठरल्या आहेत. नायिका, खल नायिका, चरित्रप्रधान, विनोदी, प्रेमळ , कजाग कोणतीही भूमिका असो ती भूमिका हुबेहुब वटविण्यात पौर्णिमाचा हातखंड आहे. साधारणत:1200 हून अधिक नाट्यप्रयोगात तिने भूमिका केल्या असून झाडीपट्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखही निर्माण केली आहे.निश्चितच पोर्णिमा तायडे यांचे अभिनयातील सादरीकरण उत्तम असते. प्रचंड आत्मविश्वास, उत्तम पाठांतर,भारदस्त संवादफेक, रंगमंचाचा पूर्ण वापर, पात्रानुरूप आकर्षक वेशभूषा, मानवी भावना आणि वर्तनाचे ज्ञान व नैसर्गिक अभिनयक्षमतेमुळे हावभावातून पात्रांचा स्वभाव, परिपोष, मनस्थिती बरोबरच नाट्यार्थ प्रकट करण्याची अचूक किमया साधत नवरसांचा आविष्कार घडवित प्रेक्षागृहास जिंकते. यू ट्यूबवर प्रचंड चाहता वर्ग असणाऱ्या प्रेक्षकाच्या पसंतीस व नाट्य समीक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून तिचा गौरवही होतो.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने,रंगकर्मी रंगभूमी निर्मित, नरेश गडेकर दिग्दर्शित, प्रा. आनंद भिमटे लिखित ‘गद्दार ‘नाटकाच्या महाराष्ट्र दौऱ्यात सहभागी होत अमरावती, कारंजा, अकोला, बीड ,लातूर,सोलापूर ,कोल्हापूर,पुणे, नाशिक, अहमदनगर अशा राज्यातील विविध ठिकाणच्या नाट्यप्रयोगात भूमिक वटविल्या आहेत. नृत्य, नाट्य, गायन व अभिनयाच्या सर्वकष क्षेत्रातील प्रभावी कर्तृत्वामुळे पौर्णिमा तायडे यांच्या सारख्या बहुगुणी रंगकर्मीने निरंतर रंगभूमीच्या आराधनाने झाडीतील रसिक प्रेक्षकांच्या रंजन व प्रबोधनाने झाडीपट्टी रंगभूमीचे क्षेत्र विस्तारित लखलखीत केले.आकर्षक अभिनयाप्रमाणेच बहारदार लावणी नृत्याने आंबट शौकीन रसिकांनाही रिझविले.झाडीपट्टी रंगभूमी गाजवलेल्या पौर्णिमा तायडे यांनी शोभायात्रेचे संयोजन, नृत्यदिग्दर्शनही केले आहे.
या एकूणच कार्यामुळे महाराष्ट्र राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा अभिनय प्रथम पुरस्कार२००६, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ५४ वा नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धा प्रथम पुरस्कार २०११, सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा महाराष्ट्र आणि गोवा पुरस्कार, प्रबोधिनी मंच चंद्रपूर द्वारा, उत्कृष्ट कलावंत, रमाई पुरस्कार २०२५ विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पडद्यावरील झगमगटाच्या विलक्षण दुनियेत वावरणाऱ्या पौर्णिमाचे पडद्यामागील वास्तव संघर्षमय व वेदनादायी आहे.व्यक्तिगत आयुष्यातील अपघातांना तोंड देत, आघातावर मात करीत, कौटुंबिक अपेष्टेने त्रस्त, केवळ अभिनयाच्या बळावरच उपजीविका असणाऱ्या ,प्रश्न- समस्यांबरोबरच कुचंबनेला, दुखरी बाजूला बगल देत, रंगमंचावर चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवणाऱ्या, भूमिका जिवंतपणे साकारणाऱ्या अस्सल संघर्षयात्री कलावंतांच्या कलानिष्ठेला विलक्षण कर्तुत्वाला मनापासून सलाम.१५ मे वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..!!
प्रा. राजकुमार मुसणे

