prabodhini news logo
Home ठळक बातम्या जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील कामवाटप झाले आता ऑनलाईन

जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील कामवाटप झाले आता ऑनलाईन

0
178

महाराष्ट्रात पहिल्यांदाच जिल्हा परिषद ठाणे मार्फत पेमेंट गेटवेचा वापर

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – ठाणे – दि. १३ सप्टेंबर २०२४ – जिल्हा परिषदे मार्फत सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर कामगार सहकारी संस्था यांना बांधकाम विभागातील १० लाखाच्या आतील विकास काम विनास्पर्धा ऑनलाईन लॉटरी पद्धतीने बी. जे. हायस्कूल येथे (दि.१३ सप्टेंबर) आज वाटप करण्यात आले. सन २०२४-२५ या वर्षातील‌ १६६ विकास कामाचे वाटप ऑनलाईन लॉटरी पद्धतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.‌

यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड घेऊन आज विकास कामाचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात आले. यामार्फत काम वाटप आणि आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे करण्याच्या उद्देशाने कामकाज करण्यात आले आहे. पुढील कामवाटप नियोजन ऑनलाईन लॉटरी पद्धतीने फेसबुक, युट्यूब दूरदृश्यप्रणाली द्वारे देखील (लाईव्ह) करण्यात येईल. विकास कामांना गती मिळण्यासाठी सुरूवात उत्तम झाली असून काम देखील उत्तम पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी व्यक्त केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विकास कामाचे वाटप ऑनलाईन लॉटरी पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून कामवाटप, वेळेची बचत, पारदर्शकता आणण्यासाठी मोलाचं आहे. कामवाटप ऑनलाईन पद्धतीने राबवणारी महाराष्ट्रातील ७ वी जिल्हा परिषद असून पेमेंट गेटवे वापर करणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ठाणे आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कामांना गती मिळणार असून लॉटरी पद्धतीने काम मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन, असे प्रास्ताविक करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी मार्गदर्शन केले.‌

यावेळी कार्यकारी अभियंता (बांधकाम) संदिप चव्हाण, उप कार्यकारी अधिकारी सुनिल बच्छाव, आरेखक संजीव यशवंत, बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी, ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापूर्वी हि प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने कामाच्या चिठ्ठया काढून लॉटरी पद्धतीन राबविण्यात येत होती. कामांचे विभाजन योग्य पध्दतीने करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून १ कोटी रक्कमेची काम ठेकेदाराने पुर्ण केल्यानंतर पुढील काम नवीन ठेकेदारास देण्यात येणार आहे.‌ ekamwatapthanezp.in या संकेतस्थळावर विकास काम प्राप्त करण्यासाठी ८६६ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते.

पुर्वीची ऑफलाईन प्रक्रिया राबवितांना कागदपत्रांचा वापर जास्त प्रमाणत होत होता तसेच जमा झालेली रक्कम चलनाद्वारे बँकेत भरावी लागत होती. आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणारी कामवाटप प्रक्रियेत स्टेशनरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार असून निविदा रक्कमेचा भरणा हा संबधित सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर कामगार सहकारी संस्था यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच ऑनलाईन सॉफ्टवेअर द्वारे विकास कामांचे वाटप झाले असून कामकाज वेगवान तंत्रज्ञान युक्त व पारदर्शक होणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने ठाणे जिल्हा परिषद हायटेक झालेली आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता (बांधकाम) संदिप चव्हाण यांनी दिली.

ही कामवाटप प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असल्याने जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर कामगार सहकारी संस्थेचे पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ऑनलाईन लॉटरी पद्धतीने काम मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त करतो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे, सद्यस्थिती, पुढील कामाचे नियोजन करण्यासाठी सुलभता निर्माण झाली आहे. – मजूर संस्थेचे पदाधिकारी सिताराम भावार्थे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here