सहा महिन्यापासून मानधन थकीत;कलावंतांची जिल्हा कचेरीवर धडक
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी वाशिम – वाशिम – जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक कलावंतांना गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या हक्काचे मानधन मिळाले नसल्यामुळे, त्यांची यावर्षीची दिवाळी अंधारात जाण्याची भिती निर्माण झाली आहे.असे झाले तर या कलावंतांना उतारवयात उपासमारीला तोंड द्यावे लागू शकते.त्यामुळे या कलावंतांना दिपावलीपुर्वी त्यांच्या हक्काचे मानधन द्या. अशी मागणी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत संजय कडोळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. या मागणीसाठी गुरुवार, दि. २५ ऑक्टोंबर रोजी कलावंतांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद तसेच समाजकल्याण विभागाला निवेदने दिली.
जिल्ह्यातील शेकडो वृद्धकलावतांना गेल्या सहा महिन्यापासून मानधन मिळाले नसल्यामुळे कलावंतांची यंदाची दिवाळी अंधारात व उपासमारीत जाणार असल्याचे चिन्हे दिसत असल्याने विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या लोककलावंतानी जिल्हा कचेरीवर धडक देऊन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांना निवेदन सादर केले आहेत. निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत संजय कडोळे,लोमेश पाटील चौधरी, उमेश अनासाने,कैलास हांडे, गोलू पाटील लाहे,सौ.इंदिराबाई मात्रे,श्रीमती कांताबाई लोखंडे इत्यादी कलावंत सहभागी होते.
उल्लेखनिय म्हणजे जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक कलावंताना राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार योजनेंतर्गत दरमहा मानधन मिळण्याच्या मागणीसाठी दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांचे नेतृत्वात विदर्भ लोककलावंत संघटनेच्या हजारो वृद्ध कलावंतानी २४ जानेवारी रोजी विराट धरणे आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन आणि शासन आदेशानुसार जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी शासकिय अधिकार्यांची जिल्हा निवड समिती स्थापन करून दि. ४ ते १० मार्च २०२४ पर्यंत सामाजिक न्याय भवन येथे वृद्ध कलावंताच्या कलेचे प्रत्यक्ष सादरीकरण घेऊन २४१ कलावंताची मानधन लाभार्थी म्हणून निवड केली होती. तदनंतर ही निवड यादी समाज कल्याण विभागामार्फत संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय जुने सचिवालय विस्तारभवन मुंबई यांचेकडे पाठवली होती. त्यामधील काही वृद्ध कलावंताना गेल्या पाच महिन्याचे दरमहा पाच हजार रुपये प्रमाणे प्रत्येकी पंचविस हजार अशी रक्कम पाठविण्यात आली. परंतु अद्यापही जिल्ह्यातील अनेक कलावंत मानधनाच्या लाभापासून वंचित असल्यामुळे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने सर्व संबंधीतांना निवेदन देवून मानधनाची मागणी करण्यात आली.

