आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
पिकांच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवल्याचा मुद्दा केला उपस्थित
वणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात वेकोलीच्या कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना वेकोलीकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर ठोस धोरण ठरवावे, अशी मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्र असे वेकोलीचे दोन मोठे विभाग आहेत. या विभागांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कोळश्याच्या धूळीचे प्रदूषण होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. परिणामी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाचाही सामना त्यांना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने वेकोली अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून, तात्पुरत्या स्वरूपात एनडीआरएफच्या धरतीवर प्रति हेक्टरी 13500 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. मात्र, भविष्यातही हा प्रश्न कायम राहणार असल्याने, वेकोली उत्पादनावर आधारित नुकसान भरपाईचे निश्चित धोरण आवश्यक आहे, याकडे आमदार मुनगंटीवार यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे.
विभागीय आयुक्तांकडून शासनाला प्रस्ताव
अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी 13 जानेवारी 2024 रोजी शासनाला धोरण ठरविण्यासाठी प्रस्ताव पाठविलेला आहे. या संदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधींची समिती गठित करून, शासनस्तरावर बैठकीचे आयोजन करण्याची गरज आहे. तसेच, शेतपीक उत्पादनाच्या प्रत्यक्ष उत्पन्नाच्या आधारभूत किमतीनुसार नुकसान भरपाईचे धोरण ठरविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशीही विनंती आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

