
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिकृतीचे अनावरण
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. ८ : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि जनजागृती व्हावी, यासाठी ८ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन झाले.
यावेळी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून जनजागृती करण्यात आली. समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते, विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी यावेळी उपस्थित होते.














