25 एप्रिल ते 8 जुन दरम्यान खोलीकरण मोहीम
चंद्रपूर – दि. 17 एप्रिल : जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतुन व जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाद्वारे इरई नदी खोलीकरण मोहीम जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. 25 एप्रिल ते 8 जून दरम्यान राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेअंतर्गत नदीतील गाळ काढण्यात येणार आहे. हा सुपीक गाळ शेतकऱ्यांना निःशुल्क नेता येईल, मात्र वाहनाची व्यवस्था शेतक-यांना स्वत: करावी लागणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
नद्या प्रदुषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर मा. उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाद्वारे इरई नदी खोलीकरणासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. इरई नदीतील गाळ काढण्याची मोहीम 25 एप्रिल ते 8 जून दरम्यान 45 दिवस राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, वन विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, भूमि अभिलेख कार्यालय, जिल्हा खनिकर्म विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ ही सर्व शासकीय कार्यालये, सीटीपीएस व डब्ल्युसीएल या खाजगी आस्थापना तर भारतीय जैन संघटना, नाम फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग लाभणार आहे.
मोहिमेदरम्यान निघणारा सुपीक गाळ निःशुल्क नेण्यास शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्याशी अथवा मंडळ अधिकारी प्रवीण वरभे (9595453655) यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

