दिवंगत नाट्यलेखक प्रेमकुमार खोब्रागडे यांना विनम्र अभिवादन
प्रा..राजकुमार मुसणे, गडचिरोली
9423639532
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – झाडीपट्टीत मन हेलावणारा ज्वलंत कौटुंबिक नाट्याशय व दमदार प्रस्तुतीमुळे ‘भूक’ नाटकाने इतिहास रचला.१९ जानेवारी २००५ प्रथम प्रयोगापासून ते आजपर्यंत यशस्वी प्रयोगाचा उच्चांक गाठणारे पाचशेपेक्षा अधिक प्रयोग संख्येचे झाडीपट्टीतील अजरामर नाटक म्हणजेच भूक अर्थात मी अतृप्त आहे.
महान सामाजिक, कौटुंबिक, लावणीप्रधान, विनोदाने परिपूर्ण, ठसकेबाज संवाद, रिक्षा चालक गरीब कुटुंबाच्या जीवनाची होणारी परवड, वहिनीच्या त्याग आणि बलिदानाने व्यापलेले व हृदयस्पर्शी, कारुण्यपूर्ण तीन अंकी नाटक म्हणजेच भूक होय.
प्रेमकुमार खोब्रागडे लिखित, स्वरबहार युवराज प्रधान दिग्दर्शित, युवा रंगमंच प्रस्तुत, सहयोग युवापट समिती दवडीपार जि.भंडारा आयोजित, झाडीपट्टीतील निवडक नाट्य कलावंताच्या संचातील ‘ भूक ‘या नाटकाचा प्रयोग ८ मार्च २०२५ ला प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या संपन्न झाला. युवराज प्रधान यांच्या युवा रंगमंच वडसा या नाट्य मंडळाचे छकुला ,संतान, माय बाप ,लाडका ,आशीर्वाद या नाटकांप्रमाणेच भूक या नाटकाचेही प्रयोग झाडीपट्टीत भरगच्च प्रेक्षकांच्या प्रतिसादात होत आहेत.
रिक्षा चालवून आपल्या भावाच्या संगोपनासाठी कष्टरत राजची व्यथा भयावह आहे. स्थानकावर थांबूनही एकही ग्राहक न मिळाल्याने पैसे मिळत नाहीत परिणामी तो भाजीपाला घ्यायला जातो पैसे नसल्याने परत येतो .केवळ एक रुपयाचे चने घेऊन घरी जातो आणि आपल्या भावाला खायला देतो. मुन्ना जेवायला मागतो त्यावेळेस मात्र राज शेखर कर निवृत्त होतो चने खाऊन पाणी पिण्यास सांगतो खिशात एक रुपया नाही घरात अन्नाचा कण नाही.पहिल्याच प्रवेशातील मुखाभिनयातून दर्शविलेल्या हतबलता अगतिकता आणि विवंचनेने रसिक प्रेक्षक भावुक होतो.
मुन्ना परीक्षा फी भरायला पैसे मागतो राज उद्विग्न होतो. खूप अभ्यास करून मोठा माणूस होण्याचे आश्वासन लहान भाऊ मुन्ना मोठ्या भावाला राजला देतो. सपना आणि राज मुन्ना साठी स्वतःच्या इचाकांच्यांना बाजूला सारं एकमेकांना साथ देण्यासाठी विवाह बंधनात अडकतात. संसारात चालवताना जीवाचा आटापिटा करीत मुन्नाच्या शिक्षणासाठी प्रसंगी सौभाग्य अलंकार विकून मदत करतात.
श्रीमंत नंदेश्वरचा भाचा विवेकानंद मद्रास मध्ये व्यवसायात जम बसविलेला, पन्नास कोटी नफा मिळताच दहा टक्के बोनस कर्मचारी मागतात. तीन हजार बोनस आणि दोन हजाराची ऍडव्हान्स देण्यासाठी पन्नास लाखाचा चेक कुटीलपणे मामाकडून घेणारा, खोटी प्रतिष्ठा जपणारा आहे. मामाची एकुलती एक मुलगी शीतलशी लग्न करण्याचे स्वप्न पाहतो ;परंतु शीतला ते मान्य नसल्याने ती त्याचा अपमान करते, घरून जायला सांगते.संतापलेला विवेकानंद आक्रस्ताळेपणा करतो. शितलचे मुन्नावर प्रेम आहे.मुन्ना हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंगच्या शिक्षणासाठी तिरुअनंतपुरम येथील ट्रेनिंग सोडून वापस येतो .परत न जाण्याचा निर्णय घेतो .त्यावेळेस मात्र त्याचा मित्र राहुल शिक्षणाचा मैदान सोडून पळून आलेला भागुबाई म्हणून त्याची हेटळणी करीत मित्राला वास्तविकतेचे भान आणून देतो. सिंगापूरला चेतनला हॉटेल मॅनेजमेंट शिक्षणासाठी एक लाखाचा चेक नंदेश्वर देताच राजशेखर मात्र तो फाडून टाकतो. आणि इंग्रजीतून नंदेश्वरला जे सडेतोड उत्तर देतो या प्रसंगास प्रेक्षक टाळ्या वाजवून चांगलीच दाद देतात. गरीब कुटुंबातील शिक्षणासाठी धडपडणारा मुन्ना ते पैशाच्या गादीवर लोळणारा चेतन शेठ यातील बदल सूचक व महत्त्वपूर्ण आहे. माडीच्या पायऱ्यावर ऑइल टाकून चेतनचा फोन आल्याचे विवेकानंद शीतलला सांगतो आणि ती पाय घसरून पडते. त्यात बाळाचा मृत्यू होतो. या धक्क्याने शीतल वेडी होते. शीतलला वाचण्यासाठी डॉक्टरांनी गर्भाशय काढल्याने ती आईच होऊ शकणार नसते. अशा प्रसंगी ही विवेक चेतनला डोकं शांत करण्यासाठी व्यसनाच्या आहारी लावतो. दुसरीकडे आजारी सपनाला राहुल दवाखान्यात नेऊन औषध उपचार करतो .रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेली नाती श्रेष्ठ ठरतात, हे नाटककार सूचित करतात.
झाडीपट्टी रंगभूमीवर गाजलेले के. प्रेम कुमार लिखित ‘आपुलकीच्या नात्याची वीण उकलत चालल्याचे वास्तव मांडणारे नाट्य म्हणजेच भूक होय . आप्तस्वकीयापासून दुरावत चालल्याचे वर्तमान समाजातील वास्तवाचे निदर्शन ‘भूक’ या नाटकात केले आहे .कष्टाने भावंडांना शिकवायचे व पंख फुटताच त्यांनी उपकाराची जाणीव न ठेवता कृतघ्न व्हायचे.किंबहुना स्वतःची स्वप्न पूर्ण करीत मजेत जगायचे .प्रसंगी ज्यांनी आपल्याला वाढवलं, घडवलं, शिकवलं ,पदरमोड करून रिक्षा चालवीत लहान भावाच्या शिक्षणासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला .सख्ख्या भावाला व वहिनीला नंतर विसरायचे, याचेच प्रत्यंतर ‘भूक’ मधून आले. ‘भूक ‘या नाटकातील नायक राज रिक्षा चालवून आपली व लहान भावाची गुजराण करतो.
स्वतः बेरोजगार राहून गुलामासारखे जीवन जगणाऱ्या राजच्या जीवनाचा रिक्षाही दारिद्रयाच्या चिखलात फसलेला. पण त्याचे एक स्वप्न आहे, काय वाटेल ते कष्ट होईल पण आपल्या लहान भावाला मुन्नाला खूप शिकवायचं त्याला खूप मोठा माणूस करायचं आणि याच स्वप्नपूर्तीसाठी सपना आणि राज हे दांपत्य धडपतात.
” स्वतः बेरोजगार राहून गुलामासारखे जीवन जगणारा माझ्यासारखा रिक्षा चालवणारा तरुण ,काय देणार उद्याच्या पिढीला ?दुःख, दैन्य ,गरिबी, लाचारी ,यातना? जेव्हा अन्नान करून मरायची वेळ येईल, तेव्हा भीकेचा कटोरा धरून फिरणारी हीच मुलं मोठी झाल्यावर मला विचारतील, बाबा तुमच्यात आम्हाला खायला घालायची ऐपत नव्हती ,तर का घातला जन्माला? जन्माला येण्याआधीच तुम्ही आम्हाला का मारून टाकले नाहीत ? काय उत्तरे देणार मी त्यांना? या संवादानी अंतर्मुख केले.
जीवन जगताना व मुन्नाला शिक्षणासठी मदत करताना स्वप्ना आणि राज यांच्या आयुष्याचं मातेरं झालेलं .प्रसंगी खस्ता खात जीवन जगणारे हे कुटुंब ,पण त्याचे एकच स्वप्न आहे ,काय वाट्टेल ते कष्ट होईल पण लहान भावाला मुन्नाला खूप शिकवायचं. त्याला खूप मोठा माणूस करायचं .हे स्वप्न उराशी बाळगत ते संघर्षमय जीवन जगतात. राज आपलं रक्त विकून व सपना मंगळसूञ विकून मुन्नाला पैसे पुरवितात.पण शिक्षण अर्धवट सोडून गावाकडे परतलेल्या मुन्नाला त्याची वहिनी सपना खडसावते. ‘कुञा आपली जात विसरणार नाही,’ हे बोलणं मुन्नाच्या जिव्हारी लागते.तिथूनच नात्यात दरी निर्माण होते.मुन्ना उद्योगपती नंदेश्वरची एकुलती मुलगी शीतलशी लग्न करून ऐशोआरामात जगतो.प्रसंगी आईप्रमाणे सांभाळ केलेल्या वहिनीच्या गंभीर आजारपणातही मुन्ना तिला भेटायला न जाता सिंगापूरला जातो अन् दुरावा अधिकच वाढतो.
त्याग अन् बांधिलकी जोपासणारा पण स्वाभिमानी राज,दातृत्वशील करूणामयी सपना,स्वकेंद्री कृतघ्न मुन्ना , उद्योजक नंदेश्वर चौहाण ,कर्तव्याची जाणीव असलेली शीतल, कामाच्या शोधात आलेली लैला, घरकाम करणारा पण हजरजबाबी असा श्याम, नर्तकी मोनिका ,स्वार्थी, धुर्त कारस्थानी विवेकानंदं, बेरोजगार पण चांगुलपणा आणि कृतज्ञ असलेला राहूल, जबाबदार तात्या या पाञांच्या सरमिसळीतून तीन अंकातील १४ प्रवेशातून सकस अभिनयाद्वारे नाट्याशय प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यात कलावंत यशस्वी ठरले.
नाटकातील संवाद विलक्षण व अवाक करणारे आहेत.’विवेकानंद म्हणजे ज्ञानाचा सागर आणि कूटनीतीचा महासागर’, ‘जिथे विवेकानंदाचा कायदा तिथे फायदाच फायदा ‘ या संदेश आनंदे यांच्या वैशिष्ट्येपूर्ण चेहऱ्यावरील भावाने व शब्दोच्चाराच्या डाॕयलाकने उत्तम परिणीती साधली. वैशिष्टयपूर्ण अभिनय व देहबोलीने श्याम(हरहुन्नरी विनोदवीर शेखर डोंगरे)यांनी प्रेक्षकांना मस्त हसविले.’आ डोकं फिरलया बयेच डोकं फिरलया ‘ हे गीत व ‘ बोर पिकलं तर कोणीही गोठा मारते’ यासारखे अस्सल झाडीबोलीतील संवादाने व विनोदाने नाटकात मजा आणली.
बहुतांशी झाडीपट्टीतील स्ञीपाञ कट-कारस्थान करणारे असते.पण ‘भूक’ मधील आपलं मूल व मंगळसूञ देणारी त्यागी सपना,सपनाच्या आजारप्रसंगी राहूलजवळ पैश्याची मदत करणारी शीतल या स्ञी व्यक्तिरेखा उत्तम साकारण्यात व नाट्याशय व्यक्त करण्यात नाटककार के.प्रेमकुमार यशस्वी ठरलेत. या निमित्ताने स्मृतीशेष डॉ.प्रेमकुमार खोब्रागडे यांच्या अनेक स्मृती जागवल्या.भूक ही त्ही अजरामर नाट्यकृती केवळ झाडीपट्टी रंगभूमीच नव्हे तर मराठी नाट्यसृष्टीत मैलाचा दगड ठरावी अशी अशी असून त्यांच्या कसदार लेखन कर्तुत्वाला सलाम.
नाटककाराच्या “बाळ फ्रीजमध्ये आलं ,कष्टाळू आहात” अशा छोट्या छोट्या संवादातूनही
प्रतिभेची उत्तुंगता प्रत्ययास येते. शेवटी ‘वहिनीचा त्याग ,माया ,ममता ,प्रेम ,बलिदान मला समजले नाही’ म्हणून माफी मागणाऱ्या मुन्नास राज माफी मागायची तर वहिनीची माग. तुझ्या प्रेमळ भेटीसाठी आसुसलेली वहिनी, जिव्हाळा आत्मीयतेची भुकेली होती. तुझ्या प्रेमाची तिला भूक होती. मुन्ना ती अतृप्त होती रे तुझ्याविना. तिची तडफड, प्रेम शेवटपर्यंत मुन्नासाठी झटली आणि शेवटच्या क्षणी ही तुझाच विचार केला. हा पोटचा गोळा सुद्धा ..”हे संवाद ऐकताना प्रेक्षागृह गंभीरते बरोबरच भावुक होते. अक्षरश:प्रेक्षकांचे डोळे पाणावतात.”दादा वहिनीचे प्रेम ,माया, भूक मला कधी समजलेच नाही. आजपर्यंत माझे दादा वहिनी माझ्या प्रेमासाठी भुकेली होती, अतृप्त होती; पण आज मात्र दादा वहिनीच्या प्रेमासाठी मी भुकेला आहे. मी अतृप्त आहे दादा वहिनींच्या प्रेमाविना…” मुन्नाच्या या अगतिकत्वाने रसिक अंतर्मुख होतो.” …का घातलंत जन्माला ?जन्माला येण्या आधीच तुम्ही आम्हाला का मारून नाही टाकलं ?काय उत्तर देणार मी ?
आणि म्हणूनच सपना नको आहेत मला बायको आणि मुलं..”भूक’ या नाटकातील संवाद निश्चितच मौलिक आणि खटकेबाज आहेत.अशा संवादातून नाट्य प्रभावीपणे साकारते
पारंपारिक ठराविक ढाच्याच्या विनोदाला फाटा देत रसिकप्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा स्वाभाविक विनोद हेही महत्त्वपूर्ण या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.बंगल्याकडे चोरून पाहणारा तरुण, कोण असावा ? कोण असावा तो ?
या अनुषंगाने निर्माण विनोद निखळ आहे. लग्नासाठी आसुसलेल्या श्यामच्या
आंधळी , लुळी ,बहिरी कसलीही असो परंतु बायको भेटली पाहिजे ,लग्नासाठी आतुर श्यामच्या खटकेबाज संवादाने प्रेक्षक हसतात. दोन बकरे ,चार कोंबड्या, पेशिल तेवढी दारू ,देवाला अमीष दाखवणारा श्याम ,प्रसन्न– सन्न, शब्दनिष्ठ विनोद, हो नाही जी, पेन ,फेमस बाई, या घरचा मेन ,नमस्कार, पाणी स्वतःच पितो, लिकेज ,फोन ,खबरदार, बहोत तरास, हँडपंप, माणूस, फास्ट या श्यामच्या हास्योत्पादकतेने प्रेक्षक लोटपोट होतात. शिवाय विनोदवीर के.आत्माराम यांच्या, दरवाजा लहान मी मोठा करतो’ चुरमुरे लाडू साईज’ अशा द्विअर्थी शब्दोच्चाराने प्रेक्षक हसतात.
‘ भूक ‘ या नाटकातील गीते ही वैशिष्ट्यपूर्ण आणि आशयसूचक आहेत. स्वरबहार नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत असलेले गायक, गीतकार युवराज प्रधान यांच्या सुमधुर गायनाने रसिक तल्लीन होतात. ‘या दुनियेच्या बाजारी कुणा सुख मिळेल कुणा दुःख रे,” आनंदाच्या तारकांना पंख लागले किरणाचे’,’ तुझा खळखळ हसरा चेहरा फुलावाणी फुलला ग’ या सामाजिक आशय व्यक्त करणाऱ्या गीताबरोबरच ‘ नको परकेपणा मला तुमची माना घरच्या वाणी, वागवा रात धुंदीतही जागवा’ अशा लावणी बरोबरच ‘डोकं फिरलया बयेच डोकं फिरलया’. अशा विनोदी गीताने व रेवा यांचे तबलावादन, संदीप उरकुडे ॲक्टोपॅड आणि ,पार्श्वगायक सचिन उर्फ दिगांबर कवासे यांचे प्रसंगानुरूप अप्रतिम आर्गनवादन व उत्तम संगीतसाथीमुळे तथा नाट्य निर्मिती शरद शेंबे, प्रयोग सहाय्यक देवा कोल्हे, ज्योती रामावर, गंधाटे साऊंड सर्विस वडधा,युवा रंगमंच आर्ट सावंगी यांच्या सहकार्यामुळे व शरद शेंबे यांच्या उत्तम समन्वयामुळे नाट्यप्रयोगात परिणामकारकता साधली.
स्वतःच्या भावासाठी त्याग करणारा, परिश्रमी, सहनशील, जबाबदारीची जाणीव असणारा कर्तव्य तत्पर भाऊ, शिवाय तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ममतेची उणीव भासू न देता संगोपन करूनही भाऊ दूर गेल्याचे शल्य मनाला बोचणारा, आत्महत्या करायला जाणारा राहुलला अडवणारा राजेश्वर (ज्ञानेश्वर मेश्राम),प्रत्येक सुखदुःखात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेणारी , मुन्नासाठी गरजा मर्यादित ठेवणारी, तडजोड करणारी, स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मुरड घालणारी व स्वतःला अपत्यही होऊ न देण्याचा निर्धार करणारी त्यागी सपना (गीता काळे),जीवाचा आटापिटा करून घडवणाऱ्या भाऊ वहिनी प्रती कृतघ्न होणारा, स्वच्छंदी वृत्तीने जगण्यासाठी धडपडणारा एशो आरामासाठी घरच्यांना लाथाडणारा चेतन (स्वरबहार युवराज प्रधान),उपकाराची फेड अपकाराने करणारी मुलं त्याची जाणीव असलेला,काळाचे भान असणारा विचारी,दूरदृष्टीचा , चेतनला मदत करणारा , वर्तनबदल झालेल्या मुन्ना समोर डोक्यावरील टोपी काढून विनंती करणारा (के.आत्माराम), घरचा विश्वासू नोकर, हजरजबाबी आणि विनोदी वृत्तीचा श्याम ( प्रा.डॉ.शेखर डोंगरे), स्वार्थी, हव्याशी, मोनिकाच्या कोटीवर जाणारा चैन- विलासात रममाण होणारा, व्यसनी,कुटील ,कारस्थानी विवेकानंद (संदेश आनंदे),शीतल इंडस्ट्रीचे मालक नंदेश्वर (विनोद काळे), मित्र प्रेम जागविणारा आणि मित्राला पैसा हे सर्वस्व नसल्याचे समजावणारा, वास्तविकेची जाणीव करून देणारा , मित्राची कानउघाडणी करणारा राहुल (जगदीश देशमुख), श्रीमंत, ऐश्वर्यसंपन्न कुटुंबातील मुलगी, हट्टी, विवेकानंदसी तुसडेपणाने वागणारी गर्विष्ठ पण लग्नानंतर मुन्नाच्या कौटुंबिक नातेसंबंधासाठी धडपडणारी , वहिनीच्या आजारपणासाठी दहा हजाराची मदत करणारी आणि पतीला वहिनीला भेटायला हवं असं खडसावून सांगणारी कुटुंबवत्सल शीतल (हेमा कापगते), नृत्यांगना मोनिका (पिंकी चौधरी), नैना (ज्योती रामावत), मुन्ना (संस्कार प्रधान) या निवडक संचातील कसदार कलावंतांच्या अभिनयाने नाट्यप्रयोग दमदार झाला.
नाट्य प्रयोगातील नेपथ्य वाखाणण्यासारखे प्रसंगाशी सुसंगत होते. स्टेजवरील नळाखाली हात धुण्याचा प्रसंग तथा रिक्षा प्रत्यक्ष स्टेजवर आणण्याचा दिग्दर्शकाच्या कल्पक नेपथ्याने निश्चितच झाडीपट्टी रंगभूमीच्या प्रेक्षकांची नाट्याभिरुची वृद्धिंगत करण्यात’ भूक ‘या नाटकाचे योगदान मान्य करावेच लागेल.
राहुलचे बाबा तरुण राहुल साठी मुलगी पाहायला जाऊन स्वतःसाठीच मुलगी न शोभन्याच्या वयात बायको म्हणून आणतात .यातून बाल जरठविवाहाच्या समस्येकडेही नाटककाराने अंगुलीनिर्देश केला आहे.इच्छा आकांक्षांना मुरड घालणारे दाम्पत्य, कर्जबाजारीपणा, खडतर जीवनसंघर्ष, मोठे झाल्यानंतर विसरलेले नाती, स्वार्थ ,कटकारस्थान, चांगुलपणाचा अभाव अन पश्चाताप अशा विविध प्रश्न समस्यांना कवेत घेत अनेकपदरी आशयसूत्रे नाट्यकृतीतून मांडण्यात नाट्यलेखक व कलावंत यशस्वी झाले.
राज आणि सपनाचा जीवन संघर्ष, राहुलचे मुन्नाला खडसावणे, सपनाने मुन्नाची केलेली हेटळणी, शीतलने केलेला विवेकानंद चा अपमान, तात्याची दूरदृष्टी,अगतिक, हतबल, विवंचनेने ग्रस्त राजचा टाहो, राजची भावावस्था व चिंतन,सपनाचे आक्रंदन , मुन्नाचा पश्चाताप , श्रवणीय गीते व क्षणाक्षणाला हासविणारा विनोद अनुभवण्यासाठी ‘भूक ‘नाटक पाहायलाच हवे.
आजच्या वास्तविकतेचे दर्शन घडविणारे, समाजभान जागृत करणारे ‘भूक ‘ हे नाटक आहे. नात्यातील विसंगती दर्शविणारे , नातेसंबंधात आंधळ्या प्रेमाने वाहून जाणाऱ्यांना डोळस करणारे हे नाटक आहे. एकंदरीत प्रेमाविना मी अतृप्त आहे, कधी क्षमणार नाही ही भूक’हाच आशय नाटकातून व्यक्त होतो.
प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली
9423639532

