भाग १ – झाडीपट्टी कलावंतांनी नाट्यसंमेलनात प्रेक्षकांना केले हसवून लोटपोट

0
51

लेखक प्रा. राजकुमार मुसणे

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या, नागपूर शाखेच्या वतीने शंभरव्या नाट्यसंमेलनाच्या औचित्याने नागपूर येथे कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित विभागीय नाट्य संमेलनात’ शतकोत्तर झाडीपट्टी ‘ या कार्यक्रमात झाडीपट्टी रंगभूमीवरील विविध तेरा नाट्य कंपन्यांच्या प्रयोगाचे यशस्वीरित्या सादरीकरण झाले. प्रत्येकनाट्य मंडळाने जीव ओतून अभिनय केल्यामुळे विलंबाने सुरू झालेले कार्यक्रम असला तरीही मात्र उत्तम झाला.
झाडीपट्टीतील आघाडीचे नाट्य मंडळ म्हणजेच चंद्रकमल थिएटर होय. निर्माता, दिग्दर्शक डॉ.शेखर डोंगरे, मार्गदर्शक के. आत्माराम यांच्या चंद्रकमल थिएटरने यश निकोडे लिखित ‘टाकलेले पोर’ या नाटकातील विनोदी प्रसंग सादर केला. नवरा बायकोच्या भांडणातून उद्भवलेल्या हास्योत्पादक प्रसंगाने व पती-पत्नीच्या भांडणात आग टाकणाऱ्या बापू विनयमुळे उडालेले भडके व रखमाच्या काठीने मारण्याच्या प्रसंगाने प्रेक्षक हसतच राहिला. भंगार विक्रेता विनय करोडपती होण्याचे स्वप्न रंगवणारा, करोडपती होण्यासाठी करोडपती मुलीशी लग्न करण्याच्या इच्छेने पछाडलेला असतो.तर त्याच्याच सारखी ड्रायव्हरची गरीब कुटुंबातली मुलगी असलेली मेघा ती सुद्धा करोडपतीच नवरा हवा या मनिषेने झपाटलेली .पण प्रत्यक्षात मात्र भंगार विक्रेता विनय आणि गरीब ड्रायव्हरची मुलगी मेघा यांच्या स्वप्नभंगाने प्रेक्षक पोट धरून हसले.

वेस वेस करणारी, उचलू उचलू आदळणारी, लहान वयाची जवान बायकोच्या आगळ्याच छळाने पछाडलेला रिटायरमेंट पोलीस पुंडलिकची व्यथा प्रसंगनिष्ठ, शब्दनिष्ठ व हावभावाने झाडीपट्टीतील लोकप्रिय विनोदवीर के .आत्माराम यांनी उत्तम साकारत प्रेक्षकांना प्रचंड हसविले.
टकल्या काकाच्या ‘वो बुलाती हैं मगर जानेका नहीं ‘या संवादाने व काळी मस, लावडीन, रस पिऊन कोयी बनवणारी, पिसाळलेली कुत्री, देवगाय, बस म्हणली तर झोपून जाते, धुलाई , सांडासारखा नवरा, अशा खास अस्सल झाडीबोलीतील शब्द उच्चारणाने प्रेक्षागृहात हशा पिकला.

खऱ्याला टकले मामाकडून वीस रुपये मागणारा, झोपायला जागा नसलेला गरीब, कंगाल असुनही जपानमध्ये प्लॉट, पंचवीस लाखाची घडी,गडगड करणारे हेलिकॉप्टर अशा अवास्तव गप्पा मेघाला मारणारा विनय प्रा. डॉ. शेखर डोंगरे यांनी परफेक्ट टाइमिंग, रिएक्शन, वाचिक व कायिक अभिनयाने देहबोलीतून अप्रतिम साकारत रसिक प्रेक्षकांना खुश केले. नवऱ्याच्या विचित्र स्वभावाचा पडदा उघड करणारी प्रसंगी आक्रमक होत त्याला काठीने बदडणारी रखमा हे पात्र पायल कडूकर यांनी जबरदस्त अभिनयाने जिवंत करीत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. घरी हवा घ्यायला साधा पंखाही नसल्याचे वास्तव उघड करणारा पुंडलिक काका, अवास्तव बढाया (पोमाडेंगी) मारणारा फेकू भंगारवाला विनय, ड्रायव्हरची मुलगी असूनही करोडपतीची मुलगी दर्शविणारी आणि करोडपत्याला आपल्या गळात अडकवण्यासाठी धडपडणारी बंडलबाज मेघा (मनिषा देशपांडे), विनयचे भंगार वास्तव माहीत होताच आक्रमक होते आणि आपणही गरीब असल्याचे सांगताना तिच्यातील धोकेबाजपणा उघडकीस येताच तिच्या नौटंकीने प्रेक्षकही हसतात. विविध व्यथांनी पछाडलेले,अवास्तव स्वप्न रंगवणारे, भलतच घडेल या आशेवर जगणारे पात्र व नवरा बायकोचे अनोखे भांडण रसिकमनाचे ठाव घेणारे होते.

ज्येष्ठ कलावंत आसावरी गडेकर यांच्या संकल्पनेतील सिनेस्टार देवेंद्र दोडके व राजा चिटणीस यांच्या प्रसंगानुरूप बहारदार संचालनाने ‘शतकोत्तर झाडीपट्टी ‘हा मध्यरात्री नंतर सुरू झालेला कार्यक्रम प्रेक्षकांची संख्या कमी असली तरी दर्दींमुळे चांगलाच रंगला. झाडीपट्टी रंगभूमीच्या विविध 13 नाट्य कंपन्यांनी सादर केलेल्या ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, कौटुंबिक, लावणीप्रधान नाटकाप्रमाणेच देशभक्तीपर व विनोदी प्रवेशाच्या प्रयोगामुळे वैविध्यपूर्णतेच्या आनंदाने पेक्षका सुखावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here