विविध योजनांचा आढावा व मार्गदर्शन
गडचिरोली, दि. २३ : जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), तसेच सहायक कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) यांनी सिरोंचा तालुक्याला दिनांक २२ मे २०२५ रोजी दौरा केला. या दौऱ्यात तालुक्यातील विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक प्रशासन व नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
दौऱ्यादरम्यान सिरोंचा तालुक्यातील टोकाचे गाव असलेल्या मौजा सोमनूर येथील नळ पाणी पुरवठा योजनेची तपासणी करण्यात आली. या वेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय तसेच अंगणवाडी केंद्रास भेट देऊन कार्यपद्धतीची पाहणी केली. त्यानंतर बालमुत्यमपल्ली, अंकिसा आणि आसरअल्लि या ग्रामपंचायतींना भेटी देत ग्रामविकास, आरोग्य, जलपुरवठा, पोषण आदी विविध विषयांवर संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
त्यानंतर तहसील कार्यालय सिरोंचा येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापन बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी उपस्थित राहून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य उपाययोजना व पूर्वतयारीसंदर्भात मार्गदर्शन केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी पंचायत समिती सिरोंचा येथे ग्रामविकास अधिकारी यांची स्वतंत्रपणे बैठक घेत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
या दौऱ्यात गट विकास अधिकारी, उप अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), उप अभियंता (बांधकाम), तालुका आरोग्य अधिकारी तसेच अन्य विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

