अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात कठोर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

0
36

“वंदे मातरम चांदा” टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 23 मे : जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक रीना जैनबंधू, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा प्रमुख नितीन धार्मिक, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) योगेश पारधी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पोलिस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूविरोधात राबवलेल्या विविध कारवायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर दोन्ही विभागांनी संयुक्तपणे तात्काळ कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यावेळी दिले. प्रशासनाच्या तत्परतेमुळे नागरिकांचा यंत्रणांवरील विश्वास वाढेल आणि अवैध दारूमुळे उद्भवणाऱ्या सामाजिक व आरोग्यविषयक समस्यांपासून त्यांना प्रभावी संरक्षण मिळेल, असेही ते म्हणाले.
अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संयुक्त पथक नियमितपणे कारवाईचा आढावा घेईल. तसेच तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करून प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यावे. अवैध दारूच्या विरोधात जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याने दिलेल्या क्रमांकांवर नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात. जिल्हा प्रशासन अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी कटीबद्ध असून, सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
तक्रारी करिता क्रमांक : जिल्हा प्रशासनाचे “वंदे मातरम चांदा” टोल फ्री क्रमांक : 1800-233-8691. राज्य उत्पादन शुल्क विभाग टोल फ्री क्रमांक : 1800-233-9999- व्हाट्सअप क्रमांक : 8422001133).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here