
प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – विसापूर : रेल्वेच्या कामासाठी स्थानिक शेतातून मातीचे उत्खनन करून, ती वाहून नेण्यासाठी प्रायव्हेट कंपन्यांकडून जड वाहने डंपर, ट्रक, जेसीबी सतत मार्गांवरून चालवली जात आहेत. यामुळे गावातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.वाहनांच्या सततच्या वजनदार वाहतुकीमुळे रस्ते उखडले गेले असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे विसापूर गावात धूळकणांचा हैदोस, रस्त्यांची वाट लागलेली अवस्था, अपघाताचे प्रमाण वाढलेले आणि शाळकरी मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे. यासह प्रदूषणामुळे वृद्ध व लहान मुले आजारी पडत आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारी असूनही प्रशासन आणि कंपन्यांचे दुर्लक्ष सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर यांच्या नेतृत्वात विसापूर ग्रामस्थांनी पुढील मागण्या प्रशासनासमोर ठणकावून मांडल्या आहेत, गावातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची तातडीने डागडुजी करून काँक्रिटीकरण करावे, जड वाहनांवर वेळेचे (सकाळी ७-१० व संध्याकाळी ४-६) निर्बंध लावावेत, शाळा सुरू असताना वाहतूक पूर्ण बंद ठेवावे, वाहने बाहेरून चालवण्यासाठी दुसरे मार्ग वापरावेत – गावातून वाहनांना मज्जाव करावा. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी मारणे बंधनकारक करावे. रस्त्याच्या कडेला झाडे लावून धुळीपासून संरक्षण करावे. अपघातग्रस्त रस्त्यांबाबत कंपन्यांकडून वार्षिक निधी मागवावा, CSR अंतर्गत गावात सामाजिक कामे सुरू करावीत. गावात जड वाहनांसाठी स्पीड लिमिट लागू करावी व स्पीड ब्रेकर बसवावेत. या मुद्द्यावर तातडीने तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घ्यावी.
“हा विकास नाही हा ग्रामस्थांवर लादलेला अन्याय आहे,गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा सरकार आणि कंपन्या गैरफायदा घेत आहेत! विसापूरमधील जनतेला रस्त्यांवरून चालताना जीव मुठीत धरावा लागतोय. रेल्वेच्या कामासाठी जमिनी घेतात, माती उचलतात, पण त्याचा त्रास मात्र गावकऱ्यांना यावर त्वरित उपाययोजना करा” अशी जळजळीत प्रतिक्रिया वंचितचे सिद्धांत पुणेकर यांनी पत्रकाराशी बोलताना दिली.
प्रायव्हेट कंपन्यांचा निष्काळजीपणा, प्रशासनाचे दुर्लक्ष, आणि जनतेच्या आरोग्य व सुरक्षिततेचा होणारा विध्वंस या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आवाज उठवत आहे. जर प्रशासन आणि कंपनीने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही विसापूरमध्ये तीव्र आंदोलन छेडू. रस्ते ठिय्या, प्रशासनाला घेराव, आणि गरज भासल्यास काम बंद आंदोलनाची तयारी वंचित बहुजन युवा आघाडीने केली आहे. यावेळेस ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन देताना वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर नीलजय गावंडे, समीर शेख, विज्ञान अलोणे, कपिल चुनारकर, उदय भगत, उत्कर्ष करमणकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















