prabodhini news logo
Home चंद्रपूर समृद्ध बल्लारपूरच्या निर्मितीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

समृद्ध बल्लारपूरच्या निर्मितीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

0
101

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

बल्लारपूरमध्ये 210 पात्र लाभार्थ्यांना घराचे पट्टे वाटप

चंद्रपूर, दि.14 : बल्लारपूरच्या विकास प्रवासात ऐतिहासिक पाऊल टाकत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) 210 निवासी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाचे नियमन करून करण्यात आलेल्या या वाटपामुळे अनेक कुटुंबांच्या आनंदात भर पडली. हा केवळ पट्टे वाटपाचा कार्यक्रम नसून, भविष्यातील सुमारे 12 हजार पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरपट्टे देण्याच्या महाअभियानाची भक्कम नांदी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बल्लारपूर, नाट्यगृह येथे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत शासनाच्या जागेवरील अतिक्रमण नियमानुकूलन निवासी पट्टेवाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल,कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे,शहर अध्यक्ष रणजंय सिंग, समीर केने, जयश्री मोहूर्ले, राजू दारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ,तहसीलदार रेणुका कोकाटे, उपअधीक्षक भूमि अभिलेख अनिल देशमुख, अग्निशमन अधिकारी शुभम रत्नपारखी, नायब तहसीलदार फुलझेले आदींची उपस्थिती होती.

आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात माझा मतदारसंघ प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी राहावा, यासाठी अत्याधुनिक सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, नगरपरिषदेची नवीन इमारत, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, स्व. विपिन रावत यांच्या नावाने जिम, क्रीडा संकुल, अभ्यासिका, सिमेंट रस्ते, छटघाट व विविध बगीचे अशा अनेक सुविधा उभारल्या असून, सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. बल्लारपूर मतदारसंघ हा विकासकामात सदैव आघाडीवर राहील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या बल्लारपूर केंद्रात 62 कोर्सेस सुरू होणार असून, यामुळे येथील बहिणींना शिक्षणात संधी व दर्जाची समानता मिळेल. स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राद्वारे महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देत, शिक्षणाबरोबरच रोजगाराची संधी निर्माण करण्यात आली आहे.

बल्लारपूरमधील साधारणतः अंदाजे 12 हजार कुटुंबे स्वतःच्या हक्काच्या जमिनीअभावी शासकीय योजना व बँक कर्जापासून वंचित आहेत. यासाठी झुडपी जंगल कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी केंद्रीय मंत्री ना.भूपेंद्रजी यादव यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. हा पट्टे वाटपाचा कार्यक्रम केवळ 210 पट्ट्यांपुरता मर्यादित न ठेवता, भविष्यातील सुमारे 12 हजार पट्ट्यांच्या वाटपाच्या महाअभियानाची सुरुवात आहे. कुटुंबाला स्वतःच्या हक्काचा घरपट्टा मिळाल्यावर त्यांचे अनेक प्रश्न कायमचे मार्गी लागतील, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here