
वेळ ही प्रत्येक प्रकारच्या कामाची मूलभूत गरज आहे. आपल्याला वेळेचे नियोजन व व्यवस्थापन करायचे असते ते जगण्याचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने उपभोगण्यासाठी, येणारा प्रत्येक क्षण जगण्यासाठी आपण त्या क्षणापूर्वी केलेली तयारी म्हणजे वेळेचे व्यवस्थापन होय.आपल्याला मिळालेला वेळ हे आपल्याकडे उपलब्ध असलेले भांडवल असते. त्याचा उपयोग कधी, कशासाठी, किती व कुठे करायचा, तसेच कशासाठी नाही करायचा याचा हिशोब ठेवण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करायचे असते.
आपल्या सर्वांना मिळणारा वेळ हा सारखाच असतो, मात्र आयुष्य प्रत्येकाला सारखे मिळत नाही.तसेच पैसा प्रत्येकाला सारखा मिळत नाही वेळेचे व्यवस्थापन करताना एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावयास पाहिजे ती म्हणजे आपल्याकडे वेळ हा मर्यादित असतो. वेळ हे साधन सर्वात जास्त मर्यादित असते. कारण अधिक परिश्रम करून इतर साधने अधिक प्रमाणात मिळविता येतात, परंतु वेळ ही प्रत्येकाला दिवसाच्या चोवीस तासापेक्षा अधिक मिळू शकत नाही.आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत प्रत्येकाला उपलब्ध असणाऱ्या वेळेचा योग्य प्रकारे विनियोग करून जास्तीत जास्त गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे हे समय व्यवस्थापनाचे पहिले व महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आपल्याला अधिक कामे करायची आहेत म्हणून कोणी आपल्याला जास्तीचा वेळ देणार नाही.
‘टाईम इज मनी’ अशी इंग्रजीत म्हण आहे. वेळ व पैसा या दोन्ही बाबी अनमोल आहेत पैशाच्या तुलनेत वेळ अधिकच मूल्यवान व उपयुक्त आहे. गरज पडल्यास पैसे इतरांकडून उधार घेता येतात किंवा कर्ज काढून पैसा उभा करता येतो व नंतर त्याची परतफेड देखील करता येते परंतु आपल्याला कितीही आवश्यकता असली तरी वेळ इतरांकडून घेता येत नाही.किंवा आपला वेळ इतरांना देता येत नाही.अथवा भविष्याकरता त्याची बचत करता येत नाही.
वेळेला खूप महत्त्व असले तरी वेळा पाडण्यापेक्षा वेळा चुकवण्याकडेच बऱ्याच जणांचा कल असतो.
डॉ. स्मिता गजभिये /तिरपुडे
लाखनी,जिल्हा.भंडारा















