
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कोरची येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव वर्ष साजरे करण्यात आले. या निमित्ताने दिनांक १४ ऑक्टोबर रोजी (मंगळवार) शाळेच्या बहुउद्देशीय सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे शूर सुपुत्र व स्वातंत्र्यसैनिक शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून झाली. त्यानंतर सर्व आदिवासी थोर विभूतींना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या आदिवासी हक्कांसाठीच्या ऐतिहासिक लढ्याची माहिती विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना देण्यात आली. भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून २०२५ हे वर्ष “जनजाती गौरव वर्ष” म्हणून घोषित केले आहे. या निमित्ताने राज्यातील सर्व शासकीय आदिवासी कार्यालये, आश्रमशाळा व निमशासकीय संस्था यांच्यामार्फत आदिवासी संस्कृतीविषयक रांगोळी, चित्रकला, निबंध, भाषण, व्याख्यान, गुणगौरव, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

या परंपरेनुसार, कोरची येथील शासकीय आश्रमशाळेतही महिनाभर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये चित्रकला, निबंधलेखन, प्रदर्शनी, नृत्य, रेला, पारंपरिक वेषभूषा, प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांचा समावेश होता. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा. प्रभूजी सादमवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच शिक्षण क्षेत्रातही मोठे यश संपादन करून शाळेचे आणि आदिवासी समाजाचे नाव उज्ज्वल करावे.”
कार्यक्रमात शाळेच्या माजी विद्यार्थिनी कु. सुषमा दर्रो हिचा विशेष सत्कार करण्यात आला. सध्या ती पुण्यातील नामांकित रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. तिचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षलता भैसारे, माजी नगराध्यक्ष कोरची या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रभू सादमवार (सहा. प्रकल्प अधिकारी, गडचिरोली), टेभुर्णीकर (निरीक्षक, प्र. का. गडचिरोली), कु. सुषमा दर्रो, सौ. कौशल्या केवास (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य), ज्येष्ठ शिक्षक भैयालाल कुरसंगे, मनोज गजभिये, हरीश कामडी, अरुण कांयदे, प्रमोद शंभरकर, अभिमन्यू वाटगुरे, राहूल अंधारे, गुरुराज मेंढे, कुणाल गोवर्धन, डाकराम ठाकरे, नितीन दूधे (अधिक्षक), गीता राऊत, मनोज आचार्य, चंद्रकांता पटले, प्रीती खंडाते, सीमा कुरेकार (अधिक्षिका), सुधाकर पुसाम, नैना येगंलवार, दिशा कोवे, अमित मेश्राम, संतोष सहारे, निकेश कन्नाके, सुरेश साखरकर, सोनाऊ सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुषमा अंबोणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भारती साखरे यांनी केले.















